नांदेड परिक्षेत्रात ‘ऑल आऊट ऑपरेशन’चा धडाका; दोन कोटींचा मुद्देमाल जप्त
नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने अवैध धंद्यांविरुद्ध पुकारलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’ अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. या धडाकेबाज मोहिमेत अहमदपूर, उमरी, मुदखेड, कळमनुरी, किनगाव आणि गंगाखेड या भागांतील अवैध वाळू उपसा व जुगार अड्ड्यांवर धाडी टाकून सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने नागरिकांना पुराव्यानिशी तक्रार करण्याचे आवाहन केल्यानंतर, प्राप्त माहितीची खातरजमा करून ही कारवाई करण्यात आली.
गेल्या 48 तासांत विशेष पथकाने लातूर जिल्ह्यातील अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुई शेतशिवारात छापा टाकून अवैधरित्या साठवलेली वाळू, हायवा ट्रक आणि जेसीबी मशीन असा मोठा मुद्देमाल हस्तगत केला. याचप्रमाणे उमरी आणि मुदखेड परिसरातही अवैध वाळू वाहतुकीवर टाच आणत संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. जुगार अड्ड्यांविरुद्धच्या मोहिमेत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे तीन आरोपींना अटक करून 42 हजार 170 रुपयांचा ऐवज जप्त केला, तर लातूरच्या किनगावमध्ये सात आरोपींकडून 44 हजार 110 रुपये आणि परभणीच्या गंगाखेड येथे 19 आरोपींना अटक करून 64 हजार 610 रुपयांची रोकड व साहित्य जप्त केले आहे. पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पूर्ण केली असून, अवैध धंदे करणाऱ्यांचे या मोहिमेमुळे धाबे दणाणले आहेत.
Comments are closed.