डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण – मुख्य आरोपी सचिन अंदुरेला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने सचिन अंदुरे याच्या जन्मठेपेची शिक्षा स्थगित करत त्याला जामीन मंजूर केला. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.
20 ऑगस्ट 2013 रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर (वय – 67) यांची पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 2014 साली हा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवला. सप्टेंबर 2021 साली पाच आरोपींविरुद्ध दोषारोप निश्चित होऊन खटल्याला सुरुवात झाली. तर मे 2024 मध्ये विशेष न्यायालयाने शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावतानाच डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची पुराव्याअभावी मुक्तता केली होती.
विशेष न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात शरद कळसकर आणि सचिन अंदुंरे याने हायकोर्टात अपील दाखल केले होते. त्यावर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. सुनावणी पूर्ण झाल्याने न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. एप्रिल महिन्यामध्ये हा निकाल खंडपीठाने जाहीर करत शरद कळसकर याची सुटका केली. त्यानंतर आता चार महिन्यांनी सचिन अंदुरे यालाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.
डॉ. दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
पुणे सत्र न्यायालयाने शरद काळसकर आणि सचिन अंदुरे यांना दोषी ठरवले होते.
— ANI (@ANI) 18 ऑगस्ट 2026
दरम्यान, दाभोलकर यांची मुलगी मुक्ता यांनीही उच्च न्यायालयात या प्रकरणातील निर्दोष मुक्ततेविरोधात आणि अंदुरे व कळसकर यांच्यावरील यूएपीएच्या कलमांचा समावेश न करण्याविरोधात अपील दाखल केले होते. ही हत्या उजव्या विचारसरणीच्या कट्टरपंथीयांच्या मोठ्या कटाचा भाग असल्याचा आरोप त्यांनी आपल्या याचिकेत केला होता.
Comments are closed.