माझ्याशी संबंध सिद्ध झाले तर राजीनामा देईन; एसीबीच्या छाप्यानंतर नरहरी झिरवाळांची पहिली प्रतिक्

नरहरी झिरवाळ: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) छापा टाकत दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात कार्यालयातील कारकून राजेंद्र ढेरंग याने 50 हजार रुपयांची लाच मागून त्यातील 35 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईनंतर आता मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

Narhari Zirwal: ‘घटना चुकीची, पाठिशी घालणार नाही’

झिरवाळ सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. एसीबीच्या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना झिरवाळ म्हणाले, “मी मागील दोन दिवसांपासून दिल्लीत आहे. काल जी घटना घडली, ती अत्यंत चुकीची आहे आणि असे व्हायला नको होते. राजेंद्र ढेरंग हे लिपिक म्हणून कार्यरत होते. सुनावणीसंबंधी कागदपत्रे तयार करण्याचे काम त्यांच्याकडे होते. ते मूळचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कर्मचारी असून, उसनवारीवर या विभागात नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी केलेल्या गैरप्रकाराला कुठेही पाठिशी घातले जाणार नाही,” असे त्यांनी सांगितले.

Narhari Zirwal: सरकारी कर्मचाऱ्याने पैसे घेणे चुकीचेच

सदर कर्मचाऱ्याचा पूर्वेतिहास माहिती होता का, या प्रश्नावर उत्तर देताना झिरवाळ म्हणाले, “माझ्यासमोर या कर्मचाऱ्याविरोधात यापूर्वी कोणतीही तक्रार आली नव्हती. लाचेची रक्कम कितीही असो, सरकारी कर्मचाऱ्याने पैसे घेणे चुकीचेच आहे. पैसे घेतले असतील, तर त्याची शिक्षा संबंधित व्यक्तीला भोगावीच लागेल,” असे त्यांनी म्हटले.

Narhari Zirwal : ‘माझ्याशी संबंध सिद्ध झाले तर राजीनामा देईन’

या प्रकरणाचे धागेदोरे तुमच्यापर्यंत येत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असल्याबाबत विचारले असता झिरवाळ यांनी ठाम भूमिका घेतली. “जर या भ्रष्टाचाराचे धागेदोरे माझ्यापर्यंत येत असल्याचे सिद्ध झाले, तर त्याची जबाबदारी घेण्यास मी तयार आहे. या प्रकरणाशी माझा थेट संबंध असल्याचे सिद्ध झाल्यास मी राजीनामा देईन,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. तर सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदावर नियुक्ती आणि विलिनीकरणाच्या बाजूने भूमिका घेतल्यामुळे आपल्याविरोधात कट रचला जात आहे का, या प्रश्नावर झिरवाळ म्हणाले, “माझ्याविरोधात कुणी कट रचेल असे मला वाटत नाही. माझा स्वभाव तसा नाही. जे घडले आहे, त्याची चौकशी होईल आणि सत्य समोर येईल,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

आणखी वाचा

NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो; शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा

आणखी वाचा

Comments are closed.