देवाभाऊ… तुमच्या मंत्र्याचे पाय खड्ड्यात अडकले आहेत, राजेहो!

भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांची फाईल उघडताच महायुतीच्या मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे. त्यातच बुधवारी एकीकडे ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण करणारे विधेयक राज्यसभेत मंजूर झालेले असतानाच मंत्री नरहरी झिरवळसदृश्य व्यक्तीचा एका ट्रान्सजेंडरसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने महायुती सरकारमधील मंत्र्याच्या कारनाम्यांची गल्लीपासून दिल्लीपर्यंत जोरदार चर्चा सुरू आहे. ‘देवाभौ… तुया मंत्र्यांचे पाय गुत्यात अडकून रायले ना राजेहो!’ अशी विचारणा स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना होऊ लागली आहे.

महायुती सरकारमधील अर्धा डझनहून अधिक मंत्री खरात फाईल्समध्ये अडकल्याचे सांगितले जात असून ते मंत्री कोण, याबाबत चर्चा सुरू आहे. खरातसोबतच्या जवळिकीमुळे रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाली. हाच न्याय खरातसोबत जवळीक असणाऱ्या नेत्यांनाही लावावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. ज्या मंत्र्याच्या सरकारी निवासस्थानात ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबत अश्लील चाळे केले गेले त्यांच्यावर फडणवीस कारवाई करणार का, याकडे सगळय़ांचे लक्ष लागले आहे.

1 अन्न आणि औषध प्रशासन खात्यातील लाचखोरीसंदर्भात मंत्र्यांच्या विरोधात कोणताही पुरावा नाही. पुरावे असल्यास एसीबीकडून कारवाई केली जाते, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यानी मंत्री नरहरी झिरवळ यांना मंत्रालयातील लाचखोरीच्या प्रकरणात क्लीन चिट दिली.

2 कृषिमंत्री असताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढताच त्यांचे खाते बदलून त्यांना क्रीडा खाते देण्यात आले. सदनिका घोटाळा प्रकरणात सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर कोकाटे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात आला.

3 बीड जिह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये धनंजय मुंडेंचे जवळचे सहकारी वाल्मीक कराड यांचा कथित सहभाग होता. कराडच्या अटकेनंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

संशयाची सुई

भोंदूबाबा खरात याच्याशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री दीपक केसरकर यांची जवळीक असल्याचे बोलले जात आहे. काही मंत्र्यांनी फडणवीस सरकार पाडण्यासाठी अघोरी कृत्य केल्याचा संशय विरोधी पक्षाने व्यक्त केला आहे.

या मंत्र्यांवर आरोप, पण कारवाई नाही

मत्री संजय शिरसाट यांनी सिडकोमध्ये 4500 कोटी रुपयांचा जमीन घोटाळा केल्याचा आरोप आहे. व्हिटस हॉटेल खरेदी प्रकरणात अडचणीत आल्यावर व्यवहारातून माघार घेतली.

मंत्री जयकुमार रावल यांच्यावर रावल को-ऑपरेटिव्ह बँकेत कोटय़वधी रुपयांचा घोटाळा केल्याचा तसेच माजी राष्ट्रपतींची 26 एकर जमीन लाटल्याचा आरोप आहे.

भाजप नेते ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणाचे पुढे काय झाले, असे लोक विचारतात.

Comments are closed.