दिंडोरी दुर्घटनेनंतर नरहरी झिरवाळांना स्थानिकांचा घेराव; ‘त्या’ 9 जणांच्या मृत्यूंना जबाबदार को
नाशिक अपघात बातम्या: दिंडोरीतील विहीर दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 9 जणांचा बळी गेल्यानंतर आज परिसरात प्रचंड तणाव आणि संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी मृतांच्या कुटुंबीयांची सांत्वन करण्यासाठी रुग्णालयात भेट दिली असता, संतप्त स्थानिकांनी त्यांना घेराव घातला. “या निष्पाप मृत्यूंना जबाबदार कोण?” असा सवाल करत नागरिकांनी क्लास चालक आणि विहीर मालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Narhari Zirwal: झिरवाळांना घातला घेराव, तक्रारींचा पाढा वाचला
नरहरी झिरवाळ रुग्णालयात पोहोचताच नागरिकांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. विहिरीला संरक्षण कठडा नसणे, रस्त्याचे अर्धवट काम आणि क्लास व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा यावर स्थानिकांनी झिरवाळांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. “जर विहिरीला जाळी असती किंवा कठडा उंच असता, तर आज 9 जीव वाचले असते,” असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला.
Narhari Zirwal: ‘दिंडोरीसाठी हा काळा दिवस’ – नरहरी झिरवाळ
माध्यमांशी बोलताना नरहरी झिरवाळ म्हणाले की, “आजचा दिवस दिंडोरीसाठी ‘काळा दिवस’ आहे. एकाच कुटुंबातील नऊ माणसं जाणं ही अत्यंत गंभीर घटना आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर पावलं उचलली जातील. विहीर मालकाने घराला कंपाउंड केलं, मग विहिरीला सुरक्षा का दिली नाही? तसेच नगरपालिकेने रस्ता विहिरीपर्यंत नेऊन तिथेच संपवला, तिथे संरक्षण भिंत असणं गरजेचं होतं. याप्रकरणी विहीर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आल्याची माहिती त्यांनी दिली.
Nashik Accident News: नेमकं कसा झाला अपघात?
दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील दरगोडे कुटुंब एका खाजगी क्लासच्या स्नेहसंमेलनासाठी दिंडोरी शहरात आले होते. कार्यक्रम आनंदात पार पडल्यानंतर सर्वजण आपल्या ‘इर्टिका’ कारने (क्रमांक MH15-JS-1053) घराकडे परतत होते. रात्री 10 वाजेच्या सुमारास शिवाजी नगर भागातील राजू राजे यांच्या विहिरीजवळ चालकाचा कारवरील ताबा सुटला. यानंतर भरधाव कार थेट पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली. अपघाताचा आवाज होताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, विहीर खोल आणि पाण्याने भरलेली असल्याने कारचा शोध घेणं कठीण जात होतं. त्यातच रात्रीचा दाट अंधार असल्याने बचाव कार्यात मोठे अडथळे येत होते. घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस आणि NDRF चे पथक घटनास्थळी दाखल झाले. शेवटी क्रेनच्या साहाय्याने कार विहिरीबाहेर काढण्यात आली, मात्र तोपर्यंत आतील नऊ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, दिंडोरी अपघात प्रकरणी विहीर मालक राजेंद्र राजे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik Accident News: विहीर मालकाच्या नातेवाईकांचे स्पष्टीकरण
दुसरीकडे, विहीर मालकाचे नातेवाईक ॲड. विक्रम राजे यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. “ही विहीर 1972 पासूनची आहे आणि दुष्काळात याच विहिरीने संपूर्ण गावाला पाणी दिले आहे. विहिरीला जाळी आणि अँगल होते, मात्र ते कोणीतरी काढून नेले. नगरपंचायतीने या रस्त्यावर जाळी बसवावी अशी आमचीही मागणी होती,” असे त्यांनी स्पष्ट केले.
Nashik Accident News: मृतांची यादी
1. सुनील दत्तात्रय दरगोडे (वय 32)
2. रेशमा सुनील दरगोडे (वय 27)
3. आशा अनिल दरगोडे (वय 32)
4. गुणवती सुनील दरगोडे (वय 11)
5. श्रेयश अनिल दरगोडे (वय 11)
6. श्रावणी अनिल दरगोडे (वय 11)
7. सृष्टी अनिल दरगोडे (वय 14)
8. समृद्धी राजेंद्र दरगोडे (वय 7)
9. श्रद्धा अनिल दरगोडे (वय 13)
(सर्व रा. इंदोरे, ता. दिंडोरी)
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.