नाशिकमध्ये नाराजीचा ‘प्रवेश’, भाजपा कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांना घेराव
फोडाफोडीचे राजकारण करून विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱयांना पायघडय़ा घालणाऱया भाजपा मंत्र्यांविरुद्ध आज गुरुवारी नाशिकमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांच्या नाराजीचा उद्रेक झाला. भाजपा कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांना घेराव घालून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पदाधिकाऱयांना धक्काबुक्कीचाही प्रयत्न झाला. या आक्रमकतेमुळे काहींनी संरक्षक कडे करून महाजन यांना कसेबसे आत नेले. निवडणूक प्रमुख असलेल्या आमदार देवयानी फरांदे यांचाही विरोध डावलून प्रवेश पार पडले. या हायव्होल्टेज ड्रामामुळे भाजपातील खदखद चव्हाटय़ावर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपाने विरोधी पक्षातील आजी-माजी पदाधिकारी पह्डून प्रवेश सोहळ्यांचा धडाका लावला आहे. यामुळे वर्षानुवर्ष पक्षवाढीसाठी खस्ता खाल्लेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. गुरुवारी दुपारी विनायक पांडे, यतिन वाघ हे माजी महापौर, काँग्रेसचे माजी गटनेते शाहू खैरे, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, माजी आमदार राष्ट्रवादीचे नितीन भोसले यांच्यासह माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश होणार याची कुणकुण लागताच सकाळीच जुने कार्यकर्ते एन. डी. पटेल रस्त्यावरील भाजपा कार्यालयाबाहेर गोळा झाले. निष्ठावान कार्यकर्त्यांना पक्ष कुठलीच संधी देत नाही, इतर पक्षातील लोकांना पायघडय़ा घालत आमच्यावर अन्याय करीत असल्याच्या आजपर्यंतच्या संतापाचा भडका उडाला.
मंत्री गिरीश महाजन यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यालय आवारात येताच त्यांना घेराव घालण्यात आला. नाही चालणार, नाही चालणार, चर्चा करा, निष्ठावंतांना डावलू नका, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. कार्यकर्ते आक्रमक झाल्याने महाजन यांच्याभोवती काsंडाळे करून काहींनी त्यांना कसेबसे आत नेले. पदाधिकाऱयांना धक्काबुक्कीचाही प्रयत्न झाल्याने मोठा गोंधळ उडाला. यामुळे काही वेळ येथे हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता.
कार्यकर्त्यांच्या प्रचंड असंतोषाला आणि निवडणूक प्रमुख आमदार देवयानी फरांदे यांच्या विरोधाला डावलून पुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी प्रवेश सोहळा उरकलाच. यामुळे पक्षातील अंतर्गत खदखद चव्हाटय़ावर आली आहे. विरोधकांना संपवण्याच्या प्रयत्नात भाजपाने आपल्याच पायावर कुऱहाड मारली आहे.
…तर पॅनेल निवडून आले असते
तीन दिवसांपूर्वी पक्षात प्रवेश केलेले बबलू शेलार आणि भाजपाचे तीन निष्ठावंत असे चौघांचे पॅनल प्रभाग 13 मधून विजयी झाले असते, असे आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या. या विधानातून त्यांनी आज प्रवेश केलेल्या पांडे, खैरे, वाघ यांच्या पराभवाचेच संकेत दिले.
काही दलाल, स्वार्थी लोकांमुळे हे घडलं – फरांदे
निवडणूक प्रमुख असूनही मला या प्रवेशांची माहिती नव्हती, चर्चेसाठी पाच-सहा जण बसले, असे होता कामा नये, असे मत आमदार देवयानी फरांदे यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडले. मंत्री गिरीश महाजन यांना चुकीच्या पद्धतीने ब्रीफ केले गेले आहे. काही दलाल आणि आपल्याच घरात तिकिटे मिळावीत या स्वार्थातून हे राजकारण घडलंय, अशी टीका केली. वरिष्ठांपुढे मी कार्यकर्त्यांची भूमिका मांडणार आहे. आज प्रवेश केलेल्यांना उमेदवारी निश्चित केली नसल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितल्याचे फरांदे यांनी स्पष्ट केले.
फरांदे यांना अश्रू अनावर
सर्वांनीच नेते व्हायचे, आपापले बघायचे, मग निष्ठावंतांना कोणी पाठबळ द्यायचं, असा सवाल आमदार देवयानी फरांदे यांनी केला. आपल्या डोळ्यासमोर कार्यकर्त्यांचा बळी दिला जात असेल तर ते बरोबर नाही, आज जे घडलं ते आवडलं नाही, पक्ष मोठा होताना निष्ठावंतांवर अन्याय होवू नये, या माझ्या भूमिकेसोबत जुने नेते उभे राहिले असते तर वेगळा संदेश गेला असता, असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.
विरोधकांना पक्षात प्रवेश देत निष्ठावंतांना डावलले जात असल्याने भाजपाच्या कार्यालयात जोरदार राडा झाला. जुन्या कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना घेराव घालून घोषणाबाजी केली.
Comments are closed.