नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणाचा खळबळजनक अँगल, पतीचे विवाहबाह्य संबंध अन् छळ; माहेरच
नाशिक क्राईम न्यूज : नाशिकमधील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर (Manisha Jejurkar) यांच्या आत्महत्येने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (6 मार्च) सकाळी सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवले. या धक्कादायक घटनेमागचे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत असतानाच आता या प्रकरणात नवा आणि गंभीर आरोप समोर आला आहे.
एनडीटीव्ही मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. मनीषा जेजुरकर यांच्या मृत्यूमागे त्यांचे पती डॉ. निलेश जेजुरकर यांचा छळ कारणीभूत असल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे.
Nashik Crime News: पतीवर विवाहबाह्य संबंधांचे आरोप
मनीषा जेजुरकर यांच्या भावाने केलेल्या आरोपांनुसार, डॉ. निलेश जेजुरकर यांचे विवाहबाह्य संबंध होते. या कारणामुळे गेल्या काही काळापासून मनीषा जेजुरकर यांना मानसिक त्रास दिला जात होता. नाशिकच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या निलेश जेजुरकर यांच्या वागणुकीमुळे त्यांच्या बहिणीला दीड वर्षांपासून मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या सर्व प्रकारामुळे मनीषा जेजुरकर मानसिकदृष्ट्या खचल्या होत्या आणि त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
Nashik Crime News: गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार
या प्रकरणी मनीषा जेजुरकर यांच्या नातेवाईकांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच डॉ. निलेश दत्तात्रय जेजुरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही कुटुंबीयांनी केली आहे. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
Nashik Crime News: नाशिकमध्ये हळहळ
डॉ. मनीषा जेजुरकर या नाशिकमध्ये आयुर्वेदिक सल्लागार म्हणून प्रसिद्ध होत्या. आयुर्वेदिक उपचार, समुपदेशन आणि पर्यायी उपचारपद्धतींच्या माध्यमातून त्या अनेक रुग्णांना आरोग्य सेवा देत होत्या. त्यांचे पती डॉ. निलेश जेजुरकर हे नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयात मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, रुग्णसेवेत सक्रिय असलेल्या आणि समाजात चांगली ओळख असलेल्या डॉ. मनीषा जेजुरकर यांनी असे टोकाचे पाऊल उचलल्याने नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. आता कुटुंबियांनी केलेल्या आरोपांनंतर या प्रकरणाची चौकशी कोणत्या दिशेने जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.