सुधाकर बडगुजरांच्या कार्यालयाबाहेर पैसे वाटपाचा आरोप, अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे पोहोचताच…; ना
नाशिक निवडणूक 2026 मतदान: नाशिक महापालिकेच्या 122 जागांसाठी आज (दि. १५) मतदान प्रक्रिया सुरू असताना शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नाशिकच्या सावता नगर परिसरात पैसे वाटप होत असल्याच्या आरोपांमुळे मोठा गोंधळ उडाला असून, काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सावता नगर परिसरात भाजप नेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या कार्यालयाबाहेर पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. या अफवेने परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली आणि वातावरण चिघळले. मतदानाच्या दिवशीच असे आरोप झाल्याने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Nashik Election 2026 Voting: मुकेश शहाणे थेट कार्यालयाबाहेर
या प्रकरणानंतर अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे थेट सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर पोहोचले. पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत त्यांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली. मुकेश शहाणे कार्यालयावर चालून आल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. समर्थक आमनेसामने आल्याने परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती.
Nashik Election 2026 Voting: पोलिसांचा हस्तक्षेप, सौम्य बळाचा वापर
गोंधळ वाढत असल्याचे लक्षात येताच पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप केला. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. काही वेळासाठी सावता नगर परिसरात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला. पैसे वाटपाचे आरोप हे अफवा की वास्तव, याबाबत अधिकृत स्पष्टता अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.
Nashik Election 2026 Voting: पहिल्या चार तासात नाशिकमध्ये 14.31 टक्के मतदान
दरम्यान, नाशिक महापालिकेसाठी आज 13 लाख 60 हजार 722 मतदार मतदानाचा हक्क बजावत असून, यामध्ये 6 लाख 56 हजार 675 महिला आणि 7 लाख 3 हजार 968 पुरुष मतदार आहेत. शहरात एकूण 1,563 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. सकाळी 11.30 वाजेपर्यंत नाशिकमध्ये 14.31 टक्के मतदान झाले आहे. सावता नगरमधील या घटनेमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण असले, तरी पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र, मतदानाच्या दिवशीच पैसे वाटपाच्या आरोपांमुळे नाशिकच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.