‘आदित्य चषक’ 2025; नाशिक शहर, पुणे ग्रामीण सुस्साट, मुलांच्या गटात धाराशीव, परभणी संघांची घोडदौड कायम

पहिल्या आदित्य चषक युवा (मुले व मुली) राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत मुलींच्या विभागात नाशिक शहर, पुणे ग्रामीण या संघांनी, तर मुलांच्या विभागात धाराशीव, परभणी या संघांनी जोरदार विजयासह धडक दिली. मुलींमध्ये नाशिक शहरने बलाढय़ मुंबई उपनगर पूर्वचा, तर मुलांमध्ये परभणीने पुणे ग्रामीणचा पराभव करत स्पर्धेचा चौथा दिवस गाजविला.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धेत पहिल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात नाशिक शहरने पूर्वार्धातील 18-24 अशा 6 गुणांच्या पिछाडीवरून मुंबई उपनगर पूर्वचा कडवा प्रतिकार 43-38 असा मोडून काढला. पूर्वार्धात चाचपडत खेळणाऱया नाशिककरांना उत्तरार्धात सूर सापडला. विदिशा सोनार, रिया खाडे यांनी शेवटच्या 5 मिनिटांत उपनगरवर लोण देत आघाडी घेतली. ती त्यांनी टिकवली. उपनगरकडून सेरेना म्हसकर, आस्था सिंग यांचा पूर्वार्धातील जोश उत्तरार्धात थोडा कमी पडला.
नाशिकच्या मुलींची आगेकूच सुरू असताना मुलांना मात्र आपला गाशा गुंडाळावा लागला. धाराशीवने नाशिक शहरचा प्रतिकार 46-33 असा मोडून काढला. धाराशीवच्या विश्वजित सुपेकर, स्वराज मुळे, सुजय कुटे यांनी चतुरस्र खेळ करीत सामन्यावर आपले वर्चस्व राखले. मुलींच्या दुसऱया सामन्यात पुणे ग्रामीणने साताऱयाला 40-15 असे सहज नमविले. पहिला लोण देत पुणे ग्रामीणने मध्यंतराला 18-06 अशी भक्कम आघाडी घेतली. मध्यंतरानंतर आपला खेळ अधिक गतिमान करीत 2 लोण देत सामना एकतर्फी केला. एकीकडे पुणे ग्रामीणच्या मुली उपांत्यपूर्व फेरीत दाखल होत असताना मुलांच्या संघाला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. परभणीने पुणे ग्रामीणला 50-25 असे सहज नमविले. दोन्ही डावांत 2-2 लोण देत परभणीने गुणांचे अर्धशतक गाठले.
मुलींच्या सामन्यात जालना संघाने नंदुरबार संघावर 42-21 मात करीत विजय मिळविला. परभणी संघाने कोल्हापूर संघावर 43-36 असा विजय मिळविला. मध्यंतराला परभणीकडे 28-11 अशी आघाडी होती. परभणीच्या सोनाली नावकीकर, रागिनी दाहे यांनी जोरदार चढाया केल्या, तर प्रतीक्षा बाबर हिने पकडी केल्या.
Comments are closed.