नाशिकमध्ये सत्ताधाऱ्यांचे कुटील राजकारण जिंकले

नाशिक महापालिकेवर कब्जा मिळवण्यासाठी फोडाफोडीचे कुटील राजकारण करून सत्ता आणि पैशाच्या जोरावर भाजपने 72 आणि शिंदे गटाने 26 जागा मिळवल्या. तब्बल आठ वर्षांनी होणारी ही निवडणूक नाशिकच्या स्वाभिमानासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण होती. मात्र, यात नाशिककर हरले, फक्त सत्ताधाऱ्यांचे कुटील राजकारण आणि पैसा जिंकला आहे.

महापालिकेच्या 31 प्रभागांमधील 122 जागांसाठी 735 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. गुरुवारी 56.67 टक्के मतदान होऊन आज सकाळी दहा केंद्रांवर मतमोजणीला सुरुवात झाली. नऊ पेंद्रावर प्रत्येकी तीन प्रभागांची, तर सातपूर क्लब हाऊस येथे चार प्रभागांची मतमोजणी पार पडली. प्रत्येक पेंद्रावर एकावेळी एकाच प्रभागाची मोजणी करण्यात आल्याने सर्व निकाल हाती येण्यासाठी बराच उशीर झाला. सर्वाधिक 72 जागा भाजपाने, 26 जागा शिंदे गटाने मिळवल्या. शिवसेना- 15, अजित पवार गट- 4, काँग्रेस- 3, मनसे आणि अपक्ष प्रत्येकी एक जागेवर विजयी झाले आहेत. या निवडणुकीत सत्तेच्या हव्यासापायी भाजपाने स्वबळावर लढत शंभर प्लसचा नारा दिला होता. बरीच प्रतिक्षा करूनही भाजपाने चर्चेसाठी न बोलवल्याने शिंदे व अजित पवार गटावर शेवटच्या क्षणी युती करून निवडणूक लढण्याची वेळ आली. संपूर्ण प्रचार काळात एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी भाजप-शिंदे गटाने सोडली नाही. भाजपाने डावललेल्या कार्यकर्त्यांना पक्षात घेवून उमेदवारी देवून या दोन्ही गटांनी भाजपाला शह देण्याचा प्रयत्न केला. महापालिकेवर कब्जा मिळवण्यासाठी त्यांनी पैसे वाटपाचा महापूर आणला. यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये गुरुवारी राडेही झाले.

दीपक बडगुजरला जोरदार धोबीपछाड

नाशिकच्या प्रभाग 29 (अ) मध्ये शिवसेना, मनसेने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी भाजपच्या दीपक सुधाकर बडगुजर याच्यावर 7 हजार 769 मतांनी दणदणीत विजय मिळवला. एबी फॉर्म पळवण्यापासून मतदानापर्यंत अनेक खटाटोप करूनही शहाणेंकडून मुलाला जोरदार धोबीपछाड मिळाल्याने सुधाकर बडगुजर यांना मोठा दणका बसला आहे

शिवसेना, मनसेचे 16 शिलेदार विजयी

नाशिक शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देऊन शिवसेना, मनसेने महापालिका निवडणूक लढवली. या शिवशक्तीचे 16 शिलेदार विजयी झाले आहेत. ते प्रभागासह शहराचा विकास आणि नाशिकचा सन्मान जपण्यासाठी सज्ज आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे पंधरा आणि मनसेचा एक शिलेदार विजयी झाला आहे.

Comments are closed.