नाशिक महानगरपालिकेची प्रभाग रचना अखेर जाहीर, 2017 चीच स्थिती ‘जैसे थे’, जाणून घ्या A टू Z माहित
नाशिक नगरपालिका निवडणुका: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने नाशिक महापालिकेची (Nashik NMC) प्रारूप प्रभागरचना शुक्रवारी (दि. 22) जाहीर करण्यात आली. मागील निवडणुकीप्रमाणे 2011 च्या लोकसंख्येचा आधार, 122 सदस्य संख्या, चार सदस्यीय प्रभाग पद्धत आणि प्रभागरचनेच्या प्रक्रियेत कुठलाही बदल झालेला नाही. त्यामुळे 2017 च्या निवडणुकीप्रमाणेच प्रभागरचना ‘जैसे थे’ राहिली आहे. सुधारित कार्यक्रमानुसार या प्रभागरचनेवर दि. 4 सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना मांडता येणार आहे. प्रारुप प्रभाग रचनेचा नकाशा आणि माहिती महापालिकेच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार शासनाच्या नगरविकास विभागाने 2022 मधील प्रभागरचनेचे आदेश कायम ठेवत, चार सदस्यीय प्रभागरचना करण्याचे निर्देश महापालिकांना दिले होते. त्यावर नाशिक महापालिकेने 2017 च्या निवडणुकीप्रमाणे 122 सदस्यसंख्या असलेले चार सदस्यीय 29 व तीन सदस्यीय दोन अशा एकूण 31 प्रभागांची प्रारूप रचना तयार करून दि. 5 ऑगस्टला राज्याच्या नगरविकास विभागाला सादर केली होती. त्यानंतर नगरविकास विभागाने प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केला होता.
प्रभागरचनेतील बदलावरून महायुतीत वादंग निर्माण झाले होते. भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रभागरचना ‘जैसे थे’ राहिल्याने महायुतीतील वादावर आता पडदा पडला आहे.
विभाग 15 आणि 19 तीन सदस्य
प्रभागरचना तयार करताना चार सदस्यीय प्रभाग पद्धत, तसेच प्रभागरचना उत्तरेपासून तयार करण्याचे नियम कायम असल्याने नाशिक महापालिकेतील मखमलाबाद परिसर यंदाही प्रभाग क्रमांक 1 ठरला आहे. चार सदस्यीय 29 प्रभाग अस्तित्वात आले असून, गत प्रभागरचनेनुसार यंदाही प्रभाग क्रमांक 15 व 19 हे दोन प्रभाग तीन सदस्यीय प्रभाग म्हणून अस्तित्वात आले आहेत.
48 हजार लोकसंख्येचे प्रभाग
प्रभागरचना करताना लोकसंख्येच्या प्रगणक गटांची जुळवणी करण्यात आली आहे. त्यानुसार प्रभागाची लोकसंख्या निश्चित करण्यात आली असून यामध्ये सरासरी 48 हजार लोकसंख्येचा एक प्रभाग अस्तित्वात आला आहे. दरम्यान, नाशिक महापालिकेत 13 मार्च 2022 पासून प्रशासकी राजवट लागली असून निवडणुका कधी होणार? याकडे राजकीय पदाधिकारी, कार्यकत्यांचे लक्ष लागले होते, अखेर शुक्रवारी महापालिकेची प्रभाग रचना जाहीर झाल्याने हालचालींना अधिक वेग येणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.