तपोवनापासून अर्धा किलोमीटरवर 500 झाडांची कत्तल

साधूग्रामसाठी तपोवनातील अठराशे झाडे तोडण्याला राज्यभरातून सर्व स्तरातून विरोध होत आहे, असे असतानाच तेथून अर्धा किलोमीटर अंतरावर वादग्रस्त मलनिस्सारण केंद्रासाठी महापालिकेने पाचशे झाडांची कत्तल केल्याने पर्यावरणप्रेमी संतप्त झाले आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिकच्या तपोवनातील अठराशे झाडे तोडण्याचा निर्णय नाशिक महापालिकेने घेतला आहे. याला भाजपा सोडून सर्वच पक्षांनी विरोध केला असून पर्यावरणप्रेमी, सामाजिक संघटना यांची आंदोलने सुरू आहेत. असे असतानाच तेथून जवळच  असलेल्या जागेत मलनिस्सारण केंद्र उभारले जाणार आहे. हे मलनिस्सारण केंद्र उभारण्याचा खर्च कोटय़वधींनी वाढविल्याने हा निर्णयही वादाच्या भोवऱयात सापडला आहे. याच केंद्रासाठी महापालिकेने पाचशे झाडांची कत्तल केली आहे.

पुरावे नष्ट केले

आसपासच्या नाल्यांमध्ये झाडे, फांद्या, खोडे टाकून देण्यात आली. काही ठिकाणी झाडे आणि खोडे मातीत गाडून पुरावे नष्ट करण्यात आले आहेत. परिसरातील नागरिकांच्या घराजवळ लाकडे टाकून दिलेली आहेत. याप्रकरणी सर्व संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

n वृक्ष प्राधिकरण समितीने सुमारे 447 झाडे तोडण्याची परवानगी दिली होती. मलनिस्सारण विभागाने त्यातील 300 झाडे तोडली, 147 झाडे वाचविली, असा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे याविरुद्ध फक्त दोनच हरकती आल्याचे व त्यांची समजूत काढल्याचे सांगण्यात आले.

Comments are closed.