तीन सामन्यात भोपळा, सुपर-8 आधी…; नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचा अभिषेक शर्मासाठ

अभिषेक शर्मा T20 विश्वचषक 2026 बातम्या : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 मध्ये टीम इंडियाचा स्फोटक सलामीवीर आणि जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज अभिषेक शर्माचा खराब फॉर्म आता चिंतेचा विषय ठरू लागला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यातही अभिषेकला खाते उघडता आले नाही. या स्पर्धेत त्याचा हा सलग तिसरा गोल्डन डक ठरला आहे.

विश्वचषक सुरू होताच त्याचा फॉर्म पूर्णपणे खालावल्याने भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला. ज्या खेळाडूकडून दमदार सुरुवातीची अपेक्षा होती, त्याचाच बॅट शांत राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नासिर हुसेन यांचा सल्ला

नेदरलँड्सविरुद्ध अभिषेकने फक्त तीन चेंडूचा सामना केला आणि तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो क्लीन बोल्ड झाला. त्याच्या या कामगिरीनंतर इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. हुसेन यांच्या मते, सलग तीन वेळा शून्यावर बाद होणे ही केवळ तांत्रिक चूक नसून मानसिक दबावाची लक्षणे आहेत.

त्यांनी म्हटले की, “सलग तीन डक कोणत्याही फलंदाजाला मानसिकदृष्ट्या खचतो. 10-20 धावा करून बाद होणे वेगळे, पण सतत शून्यावर बाद होणे हा मोठा धक्का असतो. अभिषेकसारख्या दर्जेदार खेळाडूसाठी हा मोठा धक्का आहे.”

जुने व्हिडिओ पाहा, आत्मविश्वास परत मिळवा…

नासिर हुसेन यांनी अभिषेकला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी एक साधा पण प्रभावी उपाय सुचवला आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) शी संवाद साधताना सांगितले, “अभिषेकने पुढील काही दिवस स्वतःच्या फलंदाजीचे व्हिडिओ पाहावेत. आपल्या विश्लेषकाला त्याच्या उत्कृष्ट खेळींचे क्लिप्स पाठवायला सांगावे. दोन दिवस बंद खोलीत फक्त तेच पाहावे आणि स्वतःला आठवण करून द्यावी की तो किती मोठा हिटर आणि दर्जेदार फलंदाज आहे. त्यामुळे त्याचे मन सकारात्मकतेकडे वळेल.”

मागील 6 टी-20 डावांत अभिषेक 4 वेळा शून्यावर बाद

अभिषेकसाठी हा पहिलाच टी-20 विश्वचषक आहे, पण सुरुवात अत्यंत निराशाजनक ठरली. यूएसएविरुद्ध तो गोल्डन डकचा बळी ठरला. पाकिस्तानविरुद्ध चार चेंडू खेळूनही त्याला धाव करता आली नाही. आता नेदरलँड्सविरुद्ध तिसऱ्याच चेंडूवर तो शून्यावर बाद झाला आणि त्याच्या नावावर शून्यांची हॅट्ट्रिक जमा झाली. ही खराब मालिका फक्त विश्वचषकापुरती मर्यादित नाही. मागील सहा टी-20 डावांत अभिषेक चार वेळा शून्यावर बाद झाला आहे. या सहा डावांत त्याने केवळ एका अर्धशतकासह एकूण 98 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याची कामगिरी चिंतेचा विषय ठरत आहे. संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांना आता त्याच्याकडून दमदार पुनरागमनाची अपेक्षा आहे.

हे ही वाचा –

T20 World Cup 2026 Semi-Final Predictions : झिम्बाब्वे सेमीफायनलमध्ये, पाकिस्तान अन् दक्षिण आफ्रिका OUT, टीम इंडिया…? दिग्गजाची मोठी भविष्यवाणी

आणखी वाचा

Comments are closed.