38 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा – महाराष्ट्राची सुदेष्णा वेगवान धावपटू; संजीवनीला सुवर्ण
>> विठ्ठल देवकाते
महाराष्ट्राच्या धावपटूंनी 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शनिवारपासून सुरू झालेल्या अॅथलेटिक्समध्ये पहिला दिवस गाजविला. नाशिकची खेळाडू संजीवनी जाधवने 10 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावून अॅथलेटिक्समधील पदकाचा श्रीगणेशा केला. मग पुरुषांच्या गटात किरण मात्रे याने याच शर्यतीत रौप्यपदक पटकावले. साताऱ्याची खेळाडू सुदेष्णा शिवणकरने वेगवान धावपटूचा मान मिळविला, तर पुरुषांच्या गटात पुण्याच्या प्रणव गुरवला 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
सुदेष्णाने 100 मीटर धावण्याची शर्यत 11.76 सेकंदांत जिंकली, तर प्रणव गुरवने ही शर्यत 10.32 सेकंदांत पार केली. एक शतांश फरकाने त्याचे हुकलेले सुवर्णपदक मनाला चटका लावून गेले.
सातारा येथे गेली आठ वर्षे मातीच्या मैदानावरच सराव करणाऱ्या सुदेष्णा हिने कृत्रिम ट्रॅकवर सराव करणाऱ्या खेळाडूंना मागे टाकत स्पृहणीय यश मिळवले. तिचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. 2013 मध्ये झालेल्या स्पर्धेतही तिने सुवर्णपदक जिंकले होते. सुदेष्णा सातारा येथे ज्येष्ठ प्रशिक्षक बळवंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. आमच्या शहरात कृत्रिम ट्रॅककरिता शासकीय मान्यता मिळाली असून, लवकरच हा ट्रॅक तयार करावा म्हणजे सातारा येथून आणखी आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील, असे सुदेष्णाने सांगितले.
विजेतेपदाची खात्री होती संजीवनी
यंदा विजेतेपद राखायचे माझे ध्येय होते आणि त्या दृष्टीनेच मी या शर्यतीचे नियोजन केले होते. सुवर्णपदकासाठी चिवट लढत झाली असती तर विक्रमी वेळ नोंदविली असती. मोठी आघाडी होती तरीही सातत्यपूर्ण वेग ठेवला होता, असे 28 वर्षीय खेळाडू संजीवनी हिने सांगितले.
उत्तराखंड येथे सुरू असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सातारच्या सुदेष्णा शिवनकर हिने 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले आहे.
(व्हिडीओ – विठ्ठल देवकाते, सामना, देहरादून)#38thnationalgamesuttarchand #महाराष्ट्र #Satara #स्पोर्ट्स pic.twitter.com/h8zdzvgzqe– सामाना ऑनलाईन (@सॅमानाऑनलाइन) 8 फेब्रुवारी, 2025
महिलांच्या दहा हजार मीटर शर्यतीत संजीवनीने 33 मिनिटे 33.47 सेकंद या वेळेत शर्यंत पूर्ण केली. तिचे या स्पर्धेतील हे तिसरे पदक आहे. यापूर्वी तिने याच प्रकारात एक रौप्य व एक सुवर्णपदक जिंकले होते.
किरण याने दहा हजार मीटरचे अंतर 29 मिनिटे 04.76 सेकंदांत पार केले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील त्याचे हे पहिलेच पदक आहे. जवळजवळ एक वर्ष पाठीच्या दुखण्याने स्पर्धात्मक अॅथलेटिक्स पासून दूर असलेल्या प्रणव याने येथे रुपेरी कामगिरी करत शानदार पुनरागमन केले आहे. त्याचे हे दुसरे रौप्यपदक आहे.
एक्रोबॅटिक, एरोबिक्स प्रकारांत महाराष्ट्र अंतिम फेरीत
महाराष्ट्राने यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही जिम्नॅस्टिक्समध्ये धडाकेबाज सुरुवात केली. एक्रोबेटिक व एरोबिक्स या दोन्ही प्रकारांत महाराष्ट्राने अंतिम फेरी गाठून दबदबा कायम ठेवला. महिला दुहेरीत ऋतुजा जगदाळे आणि निक्षिता खिल्लारे या जोडीने बॅलन्स सेटमध्ये नेत्रदीपक रचना सादर करून 21.110 गुणांसह अव्वल क्रमांक मिळविला. पुरुष दुहेरीत गणेश पवार व आदित्य कालकुद्रे ही जोडी 21.750 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिली. मिश्र दुहेरीत शुभम सरकटे व रिद्धी जयस्वाल जोडीने सर्वाधिक 19.010 गुणांची कमाई केली. महिला गटात सोनाली कोरडे, आर्णा पाटील व अक्षता ढोकळे या त्रिकुटाने 22.390 गुणांची कमाई करत अव्वल स्थान मिळविले. पुरुष गटात रितेश बोखडे, प्रशांत गोरे, नमन महावर व यज्ञेश बोस्तेकर या जोडीने 23.670 गुणांसह प्रथम स्थान मिळविले. एरोबिक्स प्रकारात श्रीपाद हराळ व मानसी देशमुख या जोडीला 15.15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मिश्र तिहेरी आर्य शहा, स्मित शहा व रामदेव बिराजदार या त्रिकुटाने 16.25 गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला. पुरुष गटात संदेश चिंतलवाड, स्मित शहा, अभय उंटवाल, उदय मधेकर, विश्वेश पाठक यांनी 15.80 गुणांसह पहिले स्थान मिळवित महाराष्ट्राचे वर्चस्व प्रस्थापित केले.
Comments are closed.