निसर्गसंपन्न महू धरण परिसर अजूनही अपरिचित !
जावळी तालुक्यातील महू धरण परिसर निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याने नटलेला आहे. पावसाळ्यानंतर हिरवाईने सजलेले डोंगर… शुभ्र पांढऱ्या धुक्याची चादर… निळ्याशार जलाशयात परावर्तित सोनेरी सूर्यकिरणे… हे दृश्य सध्या पर्यटकांना भुरळ पाडत आहे. त्यामुळे सध्या पर्यटकांची पावले महू धरणाकडे वळत आहेत. जावली तालुक्यातील इतर पर्यटनस्थळे जशी नावारूपाला आली, त्याप्रमाणे हे पर्यटनस्थळ अद्यापि अपरिचित असून, येथे मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे.
पावसाळ्यानंतर हा परिसर पर्यटकांच्या गर्दीने बहरलेला असतो. विशेषतः धरणाभोवतीच्या डोंगररांगांवर पसरलेलं धुकं आणि जलाशयाच्या किनाऱ्यावरून दिसणारं निसर्गवैभव पाहण्यासाठी अनेक निसर्गप्रेमी येथे दाखल होत आहेत. हा परिसर निसर्गाने नटलेला असूनही आजवर पर्यटनाच्या नकाशावर व्यवस्थित झळकू शकलेला नाही.
इथे पर्यटक निसर्गाची अनुभूती घेऊन निघून जातात. कारण येथे पर्यटकांसाठी कोणत्याही मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध नाही. परिसरात येणाऱ्यांसाठी शौचालय, पिण्याचे पाणी, सुस्थितीतील रस्ते, माहिती देणारे मार्गदर्शक फलक असे काहीच उपलब्ध नाही.
गेल्या 25 ते 30 वर्षांपासून या धरणचा जलाशय वापराविना तसाच पडून आहे. शेतीला पाणी नाही, उद्योगधंदे
नाहीत आणि पर्यटनालाही चालना नाही. परिणामी, धरणाचं खरं उद्दिष्ट फोल ठरत आहे. येथील ग्रामस्थांना होमस्टे, खानावळ, गाइड सेवा, बोटिंग यांमुळे रोजगार मिळू शकतो. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल. पण सध्या सरकारी यंत्रणा आणि पर्यटन विभागाच्या दुर्लक्षामुळे हे स्वप्न अपूर्ण राहिलं आहे. जावली तालुक्यातील कास पठार, वासोटा, बामणोली, तापोळा यांसारखी पर्यटनस्थळं नावारूपाला आली आहेत. मात्र, महू धरण अजूनही अपरिचित आहे. येथे पर्यटकांसाठी मूलभूत सोयी-सुविधा चांगल्यरीतीने उपलब्ध केल्यास हा धरण परिसर पर्यटन, बोटिंग, ट्रेकिंग, फोटोग्राफी आणि निसर्गप्रेमींसाठी आदर्श ठिकाण बनू शकेल, असा विश्वास येथील स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
बोटिंग व्यवसायाचा गाडा थांबला
धरणाचा जलाशय एवढा मोठा असूनही तांत्रिक अडचणींमुळे इथे बोटिंग व्यवसाय सुरू होऊ शकलेला नाही. इथे बोटिंग सुरू झाले असते तर हा परिसर ‘लहान बामणोली’ म्हणून ओळखला गेला असता. पर्यटकांना आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता या ठिकाणात असूनही आजपर्यंत त्याचा लाभ स्थानिकांना मिळालेला नाही.
मूलभूत सोयी-सुविधांची आवश्यकता
पर्यटकांसाठी शौचालय, पिण्याचं पाणी व स्वच्छता व्यवस्था, सुरक्षित बोटिंगसाठी तांत्रिक दुरुस्ती व परवानग्या, धरण परिसरातील रस्त्यांचा दर्जा सुधारणा, माहिती केंद्र, स्थानिक गाइड आणि सुरक्षाव्यवस्था, होमस्टे, रिसॉर्ट्स व पार्किंगची व्यवस्था या सुविधा उपलब्ध झाल्यास महू धरण परिसर निसर्गप्रेमींसाठी ‘हॉट स्पॉट’ ठरू शकेल.
Comments are closed.