‘भूमिका’ नाटकाचा ‘माझा पुरस्कार’ने गौरव; अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतील ‘असेही एक नाटय़संमेलन’ रंगणार
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतील ‘असेही एक नाटय़संमेलन’ रंगणार आहे. यावेळी ‘भूमिका’ या नाटकाला ‘माझा पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येणार आहे. या नाटकाला तब्बल सात पुरस्कार दिले जातील. हा सोहळा 24 सप्टेंबर रोजी दादर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाटय़ मंदिर येथे सायंकाळी 7.30 वाजता होईल.
अशोक मुळ्ये दरवर्षी आगळेवेगळे संमेलन भरवत असतात. आतापर्यंत त्यांनी नाटककारांचे संमेलन, गतिमंद- अपंगांच्या मातांचे संमेलन, पत्रकारांचे संमेलन, कॅन्सरमुक्तांचे संमेलन, घटस्फोटापासून परावृत्त झालेल्यांचे संमेलन अशी अनोखे संमेलने भरवली आहेत. यंदाही त्यांचे ‘असेही एक नाटय़संमलेन’ हटके आहे. नाटय़संमेलनाचे अध्यक्ष शरद पोंक्षे आहेत तर स्वागताध्यक्ष विजय केंकरे आहेत. यावेळी रंगभूमीवर गाजत असलेल्या ‘भूमिका’ या नाटकाला सात ‘माझा पुरस्कार’ दिले जाणार आहेत. यानिमित्त विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ‘माझा पुरस्कार’ चे यंदाचे 20 वे वर्ष आहे. या सोहळ्याच्या विनामूल्य सन्मानिका 22 सप्टेंबरपासून सकाळी 8.30 ते 11 आणि सायंकाळी 5 ते 8 यावेळेत श्री छत्रपती शिवाजी महाराज नाटय़ मंदिरात उपलब्ध होतील, असे अशोक मुळ्ये यांनी कळवले आहे.
भूमिका नाटकाला सात पुरस्कार
n सर्वोत्कृष्ट नाटक: भूमिका
n सर्वोत्कृष्ट नाटककार ः क्षितिज पटवर्धन
n सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ः चंद्रकांत कुलकर्णी
n सर्वोत्कृष्ट अभिनेता ः सचिन खेडेकर
n सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: समिदा गुरु
n सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ः सुयश झुंजूरके
n सर्वोत्कृष्ट नेपथ्य ः प्रदीप मुळ्ये
गाणी तुमच्या आवडीची
‘असेही एक नाटय़संमेलन’ आणि ‘माझा पुरस्कार’ सोहळ्यादरम्यान ‘गाणी तुमच्या आवडीची’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होईल. याचे संगीत संयोजन प्रशांत लळीत यांचे आहे. गायक केतकी भावे जोशी, शिल्पा मालंडकर, श्रीरंग भावे, जयंत पिंगुळकर नीलिमा गोखले गाणी सादर करतील.
Comments are closed.