नवी मुंबईत अदानीची नाफ्ता वाहून नेणारी पाइपलाइन फुटली; नेरुळ-उरण रेल्वे ठप्प, उग्र वास, दुर्गंधीमुळे हजारो रहिवासी घुसमटले

उरण ते धुतूमदरम्यान असलेली इंडियन ऑइल अदानी व्हेंचर्स लिमिटेड कंपनीचा अत्यंत ज्वलनशील नाफ्ता, पेट्रोलजन्य पदार्थ वाहून नेणारी पाइपलाइन आज सकाळी फुटली. या पाइपलाइनमधून गळती झालेला नाफ्ता न्हावाशेवा स्थानकाजवळील रेल्वे रुळाच्या शेजारीच असलेल्या डबक्यात जमा झाल्याने या भागात उग्र वास आणि दुर्गंधी सुटली. त्यामुळे येथे वास्तव्य करणाऱ्या हजारो रहिवाशांची घुसमट झाली. त्यांना चक्कर येणे, मळमळणे, श्वास घेण्यास त्रास होणे असे त्रास सुरू झाले. खबरदारीचा उपाय म्हणून नेरुळ-उरण मार्गावरील रेल्वे प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली. द्रोणागिरी-धुतूमदरम्यानची कंटेनर वाहतूक बंद करून ती अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.

जेएनपीए बंदरातील लिक्विड जेट्टीपासून दोन फूट व्यासाच्या पाइपलाइनमधून थेट धुतूम येथील इंडियन ऑइल अदानी व्हेंचर्स लि मिटेड या खासगी कंपनीत नेले जाते. तिथे 10 हजार किलो क्षमतेच्या टाकीत नाफ्ता, क्रूड ऑइल आदी पेट्रोलजन्य पदार्थ व वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक द्रव्यांची साठवणूक करून नंतर त्याचे देशभरात वितरण करण्यात येते. मात्र अदानी कंपनीच्या निष्काळजीपणामुळे नेहमीच धोकादायक, ज्वलनशील, विषारी आणि घातक क्रूड ऑइल, नाफ्ता, डिझेल, पेट्रोल व इतर रासायनिक द्रव्य पदार्थ वाहून नेणाऱ्या पाइपलाइन फुटण्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. आज सकाळी ही पाइपलाइन जेएनपीए-पागोटे उड्डाणपुलाच्या खालून जाणाऱ्या उरण – नेरुळ रेल्वे मार्गावरील न्हावा शेवा व रांजणपाडादरम्यान फुटली. त्यामुळे रेल्वेमार्गालगत असलेल्या डबक्यात मोठ्या प्रमाणात नाफ्ता जमा झाला.

घातक ज्वलनशील पेट्रोलजन्य पदार्थांच्या उग्र वासाने नागरिकांना मळमळणे, डोळे चुरचुरणे, श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून सकाळी 11.40 पासून उरण-नेरुळ मार्गावरील रेल्वे प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिली.

नेरुळ-उरण मार्गावरील लोकल गाड्यांची सेवा अचानक बंद झाल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. हजारो प्रवासी विविध स्थानकात अडकून पडले. रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही माहिती लवकर उपलब्ध न झाल्याने प्रवाशांचा संभ्रम वाढला.

पाइपलाइन फुटल्यानंतरच तातडीने द्रोणागिरी कंटेनर यार्ड परिसरातील कंटेनर वाहतूक बंद करुन ती अन्य मार्गाने वळविण्यात आली असल्याचे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे यांनी सांगितले.

फोम जोरात दाबा
पाइपलाइन फुटल्यानंतर तातडीने दोन्ही बाजूचे व्हॉल्व बंद करण्यात आले. रेल्वे रुळावर शेजारील तलाव, डबक्यात मोठ्या प्रमाणावर जमा झाल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली होती. कंपनीने वासाची तीव्रता व आगीची घटना रोखण्यासाठी जमा झालेल्या नाफ्ता, पेट्रोल जन्य पदार्थांवर फोमचा मारा केल्याने सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचे उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी सांगितले.

Comments are closed.