19 हजार कोटी खर्चाच्या नवी मुंबई विमानतळाला सहा महिन्यांत गळती, कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मोठा गाजावाजा करून २५ डिसेंबर २०२५ रोजी उद्घाटन करण्यात आलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला सहा महिन्यांत गळती लागली आहे. विमानातून प्रवासी टर्मिनलपर्यंत सामान पोहोचवणाऱ्या बॅगेज बेल्टच्या भागात अचानक पाणीची गळती सुरू झाल्यानंतर प्रवाशांची एकच पळापळ उडाली. या गळतीमुळे १९ हजार कोटी रुपये खर्च करून तयार झालेल्या पहिल्या टप्प्यातील कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील कामावर १६ हजार कोटी रुपये खर्च होणार होते. मात्र विमानतळाचे हक्क जीव्हीके समूहाकडून अदानी समूहाकडे आल्यानंतर खर्चाचे उड्डाण सुमारे तीन हजार कोटींनी वाढले. अर्धा डझन डेडलाईन हुकल्यानंतर शेवटच्या टप्प्यातील काम अत्यंत धिसाडघाईत करण्यात आले. विधानसभा निवडणुकीपूर्वी नवी मुंबईतून विमान उडवण्यासाठी रात्रंदिवस काम सुरू ठेवण्यात आले होते. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या विमानतळाला गळती लागल्यामुळे विमानतळाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. विमानतळाला गळती लागल्याचा व्हिडीओ गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या प्रकारावर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली आहे.

वातानुकूलित यंत्रणेत बिघाड

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वातानुकूलित -यंत्रणेत गेल्या दोन दिवसांपूर्वी तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे बॅगेज बेल्टवर पाण्याची गळती सुरू झाली होती. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर हा बिघाड तातडीने – दुरुस्त करण्यात आला. या गळतीचा प्रवाशांच्या सुविधेवर कोणताही परिणाम झालेला नाही, अशी प्रतिक्रिया विमानतळाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या अदानी समूहाकडून करण्यात व्यक्त आली आहे.

Comments are closed.