नेपाळ, थायलंडमधून मुली आणल्या, मसाजच्या बहाण्याने देहविक्रीचा धंदा, नवी मुंबईत पोलिसांची मोठी क

Navi Mumbai Crime News: राज्यभरात स्पा आणि वेलनेस सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचे जाळे वाढत असून अशा धक्कादायक घटना वारंवार समोर येत आहेत. नवी मुंबई पोलिसांनीही अशाच एका रॅकेटवर मोठी कारवाई करत 15 महिलांना मुक्त केले आहे. या कारवाईत थायलंडमधील दोन तरुणींसह इतर महिलांचा समावेश असून स्पा सेंटरचा मालक आणि त्याचा सफाई कर्मचारी यांना पोलिसांनी अटक केली आहे. (Sex Racket Under Spa)

सीबीडी बेलापूरमधील मॅजिक मोमेंट वेलनेस स्पा या ठिकाणी धाड टाकून पोलिसांनी 15 महिलांची सुटका केली. त्यात थायलंडमधील दोन, नेपाळमधील एक, दिल्ली व उत्तर प्रदेशातील प्रत्येकी दोन, पश्चिम बंगाल व गुजरातमधील प्रत्येकी एक तर महाराष्ट्रातील सहा महिलांचा समावेश आहे. या प्रकरणी स्पा मालक आणि त्याचा सफाई कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात आहेत. (Crime News)

मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

पोलिस आयुक्त भलिंद्र भारंबे यांनी अनैतिक व्यापार व अवैध धंदे आळा घालण्यासाठी विशेष मोहिम सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना माहिती मिळाली की, बेलापूरमधील या स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालतो. माहिती खातरजमा करण्यासाठी पथकाने एका बनावट ग्राहकाला आत पाठवले. त्याने मिळवलेल्या पुराव्यांच्या आधारे शनिवारी संध्याकाळी छापा टाकण्यात आला.

स्पा-मालकासह सफाई कामगारही पोलिसांच्या जाळ्यात 

या छाप्यात पोलिसांना महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले जात असल्याचे समजले. स्पाचा मालक आणि सफाई कर्मचारी हे महिलांना मसाजसाठी बोलवून ग्राहकांना “विशेष सेवा” पुरवण्यास भाग पाडत असल्याचे उघड झाले. ग्राहकांकडून सहा हजार रुपये आकारले जात असल्याचेही समोर आले. सुटका केलेल्या महिलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे. दुसरीकडे, या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

नवी मुंबईत यापूर्वीही अशाप्रकारे स्पाच्या आड वेश्याव्यवसायाचे प्रकरण समोर आले आहे. मात्र, यावेळी थेट विविध राज्ये व परदेशातील महिलांचा यात समावेश असल्याने या रॅकेटचे स्वरूप किती मोठे आहे, हे स्पष्ट झाले आहे. पोलिसांकडून अशा बोगस स्पा सेंटरवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी संशयास्पद हालचालींबाबत माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.