माझी वसुंधरा अभियान, नवी मुंबई राज्यात दुसरी; वरळी येथे पार पडला पुरस्कार वितरण सोहळा
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियानात नवी मुंबई महापालिकेने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. वरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात महापालिकेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या वर्षीही नवी मुंबई पालिकेने या अभियानात राज्यात दुसरा क्रमांक मिळवला होता. यंदाही हे स्थान कायम ठेवल्यामुळे पालिका प्रशासनावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. माझी वसुंधरा अभियानातील पुरस्कारांचे वितरण करण्यासाठी राज्य शासनाने वरळी येथे शनिवारी एका विशेष सोहळ्याचे आयोजन केले होते.
या सोहळ्याला महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते व विभागाच्या सचिव जयश्री भोज यांच्या उपस्थितीत पुरस्कार स्वीकारला. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
- याच समारंभात पालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान ‘4.0’ आणि ‘5.0’ या दोन्ही वर्षांतील राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच ‘अभियान 4.0’मध्ये ‘भूमी’ या थीमॅटिक विशेष गटात सर्वोत्तम कामगिरीबद्दल पारितोषिकही देण्यात आले.
- पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांवर आधारित अभियानांतर्गत महापालिकेने विविध क्षेत्रांत उपक्रम राबवले आहेत. हरित आच्छादन वाढवण्यासाठी स्थानिक प्रजातींची वृक्ष लागवड करण्यात आली आहे. जिओटॅगिंगसह वृक्षगणना, लोकजैवविविधता नोंदवही तयार करणे, बीज संकलन केंद्र उभारणे आदी उपाययोजना करण्यात आल्या.
- घनकचरा व्यवस्थापनात स्त्रोतस्थळी कचरा विभाजन, ओल्या कचऱ्याचे स्थानिक प्रक्रियाकरण, सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण आणि प्लॅस्टिकविरोधात कठोर अंमलबजावणी करण्यात आली आहे.
- जलव्यवस्थापनात पावसाचे पाणी साठवण, भूजल पुनर्भरण, मलनिःसारण प्रकल्पांमधील प्रक्रियायुक्त पाण्याचा पुनर्वापर यांसारख्या उपाययोजना राबवण्यात आल्या. या उपक्रमांची दखल शासनाच्या वतीने घेण्यात आली आहे.
Comments are closed.