एनएमएमटीला इलेक्ट्रिक बसेस परवडेना, 2026-27 च्या अर्थसंकल्पासाठी अंदाजपत्रक परिवहन समितीला सादर
डिझेल आणि सीएनजीवर चालणाऱ्या बसेसच्या तुलनेत इलेक्ट्रिक बसेस खरेदीसाठी सुमारे तिप्पट रक्कम मोजावी लागत असल्याने या बसेस नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेला परवडत नाहीत. त्यामुळे यापुढे सीएनजी बसेस खरेदीवर विशेष भर दिला जाणार असल्याचे परिवहन समिती आणि प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परिवहन सेवेचा 2026-27 चा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी एनएमएमटीचे महाव्यवस्थापक योगेश कडूसकर यांनी अंदाजपत्रक सभापती विलास झंजाड यांच्याकडे आज सादर केले.
नवी मुंबई पालिकेचे सभागृह नेते सागर नाईक यांनी केलेल्या बदलानुसार प्रशासनाने परिवहन समितीमध्ये अर्थसंकल्प न सादर करता फक्त अंदाजपत्रक आज सादर केले. या अंदाजपत्रकावर चर्चा करून परिवहन समिती अर्थसंकल्प तयार करून तो स्थायी समितीला सादर करणार आहे. अंदाजपत्रक सादर करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेला स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील, नगर सचिव संघरत्ना खिलारे आदी उपस्थित होते.
पाच वर्षांतील कामांची चौकशी करणार
नवी मुंबई महापालिकेमध्ये गेल्या पाच वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. या कालावधीत एनएमएमटीमध्ये जी कामे झाली आहेत, त्या कामांची चौकशी करण्यात येणार आहे. एनएमएमटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे यावेळी सभापती विलास झंजाड यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.