नवी मुंबईत भाजपकडून मंदा म्हात्रे यांची फसवणूक; 13 जणांना उमेदवारी दिली, पण एबी फॉर्म दिलाच नाही

महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग पाहायला मिळाली. मात्र, नवी मुंबईत भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मी मागितलेल्या 13 जणांना उमेदवारी दिली, मात्र एबी फॉर्म दिलाच नाही, असा आरोप आमदार मंदा म्हात्रे यांनी केला आहे. तसेच मंत्री गणेश नाईक आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्यावर सडकून टीका करत त्यांनी 111 उमेदवार निवडूण आणून दाखवावे, असे खुले आव्हान मंदा म्हात्रे यांनी नाईकांना दिलं आहे.

नवी मुंबईच्या राजकारणात ऐरोलीचे आमदार गणेश नाईक आणि बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्यामध्ये उमेदवारांवरून शाब्दिक खडाजंगी झाल्याचे चित्र आज पाहायला मिळालं. मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेत गणेश नाईक आणि संजीव नाईक यांच्यावर सडकून टीका केली आहे. “आम्ही 111 जागा मागितल्या नाहीत तर ज्या ठिकाणी नगरसेवक नाही अशा 20 जागा मागितल्या. त्यापैकी 13 जागा देण्यात आल्या. मुख्यमंत्री आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्याशी बोलून हे ठरवण्यात आले. मात्र माझ्या मुलाला उमेदवारी दिल्याने कदाचित ते नाराज झाले असावे. माझे फोन संजीव नाईक यांनी उचलले नाहीत, जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी 13 फॉर्म दिले मात्र त्यावर सही केली नाही.” अशी खदखद मंदा म्हात्रे यांनी बोलून दाखवली.

गणेश नाईक आणि त्यांच्या मुलाची मनमानी सर्व महाराष्ट्राला माहित आहे – मंदा म्हात्रे

“जिल्हाध्यक्ष गायब झाले की त्यांचे अपहरण झाले, की ते स्वत: लपून बसले, की कोणाच्या दबावाला बळी पडले मला माहिती नाही. भाजपचे प्राथमिक सदस्यत्व नाही. त्यांनाही एबी फॉर्म दिले आहेत. गणेश नाईक आणि त्यांच्या मुलाची मनमनाी सर्व महाराष्ट्राला माहित आहे. एवढे स्वत:ला मोठे नेते समजता तर 111 जागा निवडूण आणून दाखवाच, नाहीतर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन.” असं आव्हान मंदा म्हात्रे यांनी नाईक पिता-पुत्रांना केले आहे.

Comments are closed.