ऐन दिवाळीत नळ कोरडे; पाणीटंचाईने रहिवासी हैराण, नवीन पनवेलमध्ये महाविकास आघाडीचा पाण्यासाठी सिडकोवर आक्रोश मोर्चा

नवीन पनवेल शहरात ऐन दिवाळीच्या कालावधीत निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने आज आक्रोश मोर्चा काढला. शिवा कॉम्प्लेक्सपासून सिडको पाणीपुरवठा विभाग कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चामध्ये शेकडो रहिवासी सहभागी झाले. रहिवाशांनी सिडकोच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने सर्व परिसर दणाणून गेला.

नवीन पनवेल परिसरात मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिल्यामुळे नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ऐन दिवाळीच्या कालावधीत नवीन पनवेल परिसरातील नळ कोरडे राहिले. पाणी न आल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यंदा मुबलक पाऊस पडल्याने रायगड जिल्ह्यातील सर्वच धरणे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्यानंतरही नवीन पनवेलला पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने महाविकास आघाडीने आज सिडकोच्या पाणीपुरवठा कार्यालयावर धडक दिली.

हे आंदोलन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत व माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या मोर्चात काँग्रेसचे हरेश केणी, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, मनसेचे योगेश चिले, बबन विश्वकर्मा, महानगर समन्वयक दीपक घरत, महानगरप्रमुख अवचित राऊत, तालुकाप्रमुख संदीप तांडेल, महानगर संघटक गुरुनाथ पाटील, शहरप्रमुख यतीन देशमुख, प्रवीण जाधव, सदानंद शिर्के, गुरू म्हात्रे, रामदास गोवारी, जिल्हा युवाधिकारी पराग मोहिते, शहर संघटक मालती पिंगळा, कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आजपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार

नवीन पनवेल आणि करंजाडे भागाला वर्षाचे बारा महिने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यावर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर या भागाचा पाणीपुरवठा उद्यापासून सुरळीत करण्यात येणार आहे, असे आश्वासन सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिले असे शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी यावेळी सांगितले. जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही शिरीष घरत यांनी यावेळी दिला.

अधिकाऱ्यांकडून चालढकल

नवीन पनवेल, करंजाडे आणि तळोजा परिसराला वर्षभर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहेत. या भागात गृहनिर्माण प्रकल्प मोठ्या संख्येने उभे राहिले असले तरी पाण्याची व्यवस्था करण्यात सिडको अपुरी पडली आहे. याबाबत वारंवार आवाज उठवण्यात आला आहे. मात्र अधिकाऱ्यांकडून नेहमीच चालढकल केली जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

Comments are closed.