नौदलाला मिळाली 'तिहेरी शक्ती'

अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्टसह तीन जहाजांचे जलावतरण

वृत्तसंस्था/ कोची

कोचीन शिपयार्डमध्ये शनिवारी पाणबुडीविरोधी युद्धनौकेसह तीन जहाजांचे जलावतरण केल्यामुळे भारतीय नौदलाला ‘तिहेरी शक्ती’ प्राप्त झाली आहे. तीन जहाजांच्या समावेशामुळे देशाच्या सागरी शक्तीला मोठी चालना मिळणार आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या निर्मितीमुळे आता नौदल व्यावसायिक आणि हरित सागरी क्षेत्रात त्याचे नेतृत्व सिद्ध करू शकणार आहे. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत बांधलेली ही जहाजे भारताच्या अभियांत्रिकी कौशल्याचा आणि स्वदेशी उत्पादनाचा पुरावा आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील जहाजबांधणी कंपनी कोचीन शिपयार्ड लिमिटेडने (सीएसएल) शनिवारी भारतीय नौदलासाठी बनवलेले अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्टचे (एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी) जलावतरण केले. तसेच ‘सीएसएल’ने हायब्रिड इलेक्ट्रिक मिथेनॉल-रेडी कमिशनिंग सर्व्हिस ऑपरेशन व्हेसल (सीएसओव्ही) आणि ट्रेलर सक्शन हॉपर ड्रेजर – ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (डीसीआय) ड्रेज गोदावरी या अन्य दोन जहाजांचेही लाँचिंग केले आहे. नवी दिल्ली येथील युद्धनौका उत्पादन आणि अधिग्रहण नियंत्रक व्हाईस अॅडमिरल आर स्वामीनाथन यांच्या पत्नी रेणू राजाराम यांच्या उपस्थितीत शनिवारी सायंकाळी ‘एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी’चे उद्घाटन करण्यात आले. ‘सीएसएल’मध्ये भारतीय नौदलासाठी बांधल्या जाणाऱ्या आठ ‘एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी’च्या मालिकेतील हे सहावे जहाज आहे. नौदलातील समावेशानंतर आता या जहाजाची ओळख ‘आयएनएस मगदाळा’ अशी असल्याची माहिती ‘सीएसएल’ निवेदनातून दिली आहे.

कोचीन शिपयार्डने एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या श्रेणीतील जहाजे लाँच करत  चीन आणि पाकिस्तानसारख्या शत्रूराष्ट्रांना धडकी भरवणारा स्पष्ट संदेश दिला आहे. तसेच भारत आता नौदल बांधणीत केवळ स्वावलंबी नाही तर ‘ग्रीन मेरीटाईम तंत्रज्ञानातही वेगाने प्रगती करत असल्याचे दाखवून दिले आहे. ही जहाजे मेरीटाईम इंडिया व्हिजन 2030 आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत अभियांत्रिकी उत्कृष्टता आणि स्वदेशीकरणासाठी भारताची वचनबद्धता प्रतिबिंबित करतात.

पाण्याचे बुडबुडे, जहाज,

‘एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी’ हे शत्रूच्या पाणबुड्या शोधण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी डिझाइन केलेले जहाज आहे. हे आठ जहाजांच्या मालिकेतील सहावे जहाज आहे. ते 78 मीटर लांब असून 25 नॉट्स (अंदाजे 46 किमी/तास) वेगाने जाण्यास सक्षम आहे. ते अत्यंत प्रगत सेन्सर्स, हलके टॉर्पेडो, रॉकेट आणि शस्त्रास्त्रे आदी क्षमतांनी सुसज्ज आहे. ते जुन्या ‘अभय’ श्रेणीच्या जहाजांची जागा घेणार असल्यामुळे किनारी भागात नौदलाच्या पाणबुडीविरोधी क्षमतांमध्ये आणखी वाढ होणार आहे.

हायब्रिड इलेक्ट्रिक ‘ग्रीन’ जहाज

दुसरे जहाज हे हायब्रिड इलेक्ट्रिक मिथेनॉल-रेडी ‘सीएसओव्ही’ असून ते ऑफशोअर विंड टर्बाइनच्या देखभालीसाठी डिझाइन केलेले आहे. हे 93 मीटर लांब आणि 19.6 मीटर रुंद जहाज खोल समुद्रातील तंत्रज्ञांसाठी ‘फ्लोटिंग हॉटेल’ म्हणून काम करेल. यात हायब्रिड-इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टम, मिथेनॉल-रेडी इंजिन आणि मोठ्या लिथियम-आयन बॅटरी आहेत. यामध्ये मोशन-कम्पेन्सेटेड गॅंगवे सिस्टीम सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे.

DCI ड्रेज गोदावरी

तिसरे जहाज म्हणजे डीसीआय ड्रेज गोदावरी हे असून ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियासाठी बांधण्यात आले आहे. 12,000 घनमीटर क्षमतेचे हे ट्रेलर सक्शन हॉपर ड्रेजर 36 मीटर खोलीपर्यंत ड्रेज करू शकते. याचा अर्थ हा भव्य ड्रेजर आता बंदरे आणि समुद्रमार्ग गाळमुक्त ठेवण्याची जबाबदारी पार पाडणार आहे.

Comments are closed.