नक्षलवादी 'ब्रेन' गणपतीला नेपाळमधून अटक

15 नक्षलवादी करणार आत्मसमर्पण

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

नक्षलवाद्यांचा ‘ब्रेन’ संबोधिण्यात येणाऱ्या गणपतिला अखेर पोलिसांनी नेपाळ येथून अटक केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे नक्षलवादाला मोठा झटका बसला आहे. याचबरोबर नक्षलवाद्यांचा एक गट पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याच्या तयारीत आहे. क्रूर नक्षली आणि नक्षलींचा ब्रेन अशी ओळख असलेल्या गणपतिला नेपाळमधून ताब्यात घेण्यात आले आहे. गणपति हा पॉलिट ब्युरो मेंबर असण्यासोबत 2004-18 पर्यंत सेंट्रल कमिटीचा सचिव होता. गणपतिला अचानक अटक झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा झटका बसला आहे. सुरक्षादलांवर झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये गणपतिचा सहभाग राहिला आहे.

गणपतिचा शोध सुरक्षा दल दीर्घकाळापासून घेत होते, त्याच्या शोधासाठी वेगवेगळी पथके स्थापन करण्यात आली होती. अशास्थितीत आता दीर्घ प्रयत्नानंतर गणपतिला ताब्यात घेण्यास सुरक्षा दलांना यश मिळाले आहे. त्याच्या चौकशीतून नक्षलवादाविषयी महत्त्वाची माहिती मिळणार असल्याचे मानले जात आहे. या माहितीच्या आधारावर सुरक्षा दलांना यापुढे धडक कारवाई करता येणार आहे. सातत्याने नक्षली म्होरक्यांकडून आत्मसमर्पण केले जात असल्याने नक्षलवाद्यांचे मनोबल खालावू लागले आहे. यामुळे आणखी काही नक्षलवादी आत्मसमर्पण करु शकतात. यात पूर्व बस्तर डिव्हिजन कमिटीचे सदस्य अन् डीव्हीसीएम स्तराचे नक्षली सामील आहेत, जे स्वत:च्या शस्त्रास्त्रांसह आत्मसमर्पणासाठी पोहोचू शकतात. नक्षलींच्या या आत्मसमर्पणावरून लवकरच पोलिसांकडून माहिती दिली जाऊ शकते.

Comments are closed.