इंडिया गेटवर नक्षलवादी हिडमा पोस्टर्स प्रदर्शित
दिल्ली प्रदूषणाविरुद्धच्या निदर्शनादरम्यान प्रकार : 22 जणांना अटक, ‘लाल सलाम’, ‘अमर रहे’च्या घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील इंडिया गेटवर रविवारी संध्याकाळी उशिरा वायू प्रदूषणाविरुद्धच्या निदर्शनात सहभागींनी देशातील मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी कमांडर माडवी हिडमाचे पोस्टर झळकवल्याचे निदर्शनास आले. सदर पोस्टरमध्ये हिडमाची तुलना आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्याशी करण्यात आली. हिडमाचे वर्णन पाणी, जंगले आणि जमिनीचे रक्षक म्हणून करण्यात आले. निदर्शकांनी ‘माडवी हिडमा अमर रहे!’ अशा घोषणा दिल्या. तसेच त्यांनी पोस्टरवर ‘माडवी हिडमाला लाल सलाम’ असा उल्लेख केल्याने निदर्शकांवर कारवाई करण्यात आली. या आंदोलनादरम्यान 22 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
निदर्शनादरम्यान जमावाने पोलिसांशी झटापट केली. निदर्शकांनी पोलिसांवर पेपर स्प्रे फेकल्यामुळे तीन ते चार पोलीस जखमी झाले. दिल्ली पोलिसांनी सोमवारी दोन पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केले. 1 कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी हिडमा 18 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशातील एलुरी सीताराम राजू जिह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत मारला गेला होता. तो अडीच दशकांपासून छत्तीसगडच्या बस्तर प्रदेशात सक्रिय होता. तो तब्बल 26 मोठ्या हल्ल्यांचा मास्टरमाइंड होता.
आंदोलकांकडून पेपर स्प्रेचा वापर
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रविवारी सी-षटकोणाजवळ निदर्शक जमले होते. त्यांच्या निषेधामुळे रुग्णवाहिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जाण्यास अडथळा येत होता. पोलिसांनी त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला तेव्हा परिस्थिती संघर्षात रुपांतरित झाली. काही निदर्शकांनी पोलीस अधिकाऱ्यांवर पेपर स्प्रे फेकला. या आंदोलनादरम्यान पहिल्यांदाच निदर्शकांनी वाहतूक आणि कायदा आणि सुव्यवस्था अधिकाऱ्यांवर पेपर स्प्रेचा वापर केला. जखमी पोलीस अधिकाऱ्यांवर आरएमएल रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे नवी दिल्लीचे उपायुक्त देवेश कुमार महाला यांनी माध्यमांना सांगितले.
Comments are closed.