‘नायक’ची पंचवीशी; अनिल कपूरने जागवल्या ‘शिवाजी राव’च्या आठवणी
अनिल कपूरचा 25 वर्षांपूर्वी नायक नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. नुकतेच या सिनेमाला 25 वर्षे पूर्ण झाली. याचे निमित्त साधून, अनिल कपूर यांनी चित्रपटातील ‘शिवाजी राव’ या भूमिकेसंदर्भातील एक भावपूर्ण पोस्ट शेअर केली आहे. या चित्रपटामध्ये अनिल कपूर यांनी टेलिव्हिजन पत्रकाराची भूमिका वठवली होती. एस. शंकर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनलेल्या शिवाजी रावच्या माध्यमातून चित्रपटाने भ्रष्टाचार, राजकीय उत्तरदायित्व आणि व्यवस्थेत बदल घडवण्याची क्षमता यावर भाष्य केले.
‘शिवाजी राव’ची भूमिका आपल्यासाठी खास का होती, हे सांगताना कपूर म्हणाले की, सामान्य माणूस मुख्यमंत्री होतो, एवढाच या भूमिकेचा भाग नव्हता. सत्ता आणि अधिकार मिळाल्यानंतर त्यांचा वापर सामान्य नागरिकांच्या हितासाठी कसा केला जातो, हे अधिक महत्त्वाचे होते. लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने ही भूमिका साकारणे आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले.
चित्रपटात दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांनी प्रभावशाली राजकारणी बलराज चौहान यांची भूमिका साकारली होती. शिवाजी राव आणि बलराज चौहान यांच्यातील संघर्षमय प्रसंग चित्रपटातील लक्षवेधी भाग ठरले. 25 वर्षांनंतरही ‘नायक’ची कथा प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. देशहित आणि नागरिकांच्या कल्याणासाठी सत्तेचा वापर करण्याचा विचार कालबाह्य होणार नाही, असे कपूर यांनी आपल्या पोस्टमधून अधोरेखित केले.
Comments are closed.