सूरज चव्हाणांचे राजकीय पुनर्वसन करताच अजितदादांच्या राष्ट्रवादीत वादाची ठिणगी, तटकरेंच्या कार्य

एनसीपी अजित पवार गट: विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान रमी खेळणाऱ्या तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याच्या पार्श्वभूमीवर, छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणानंतर सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते. मात्र, अवघ्या एका महिन्याच्या आतच त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले असून, त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare), मंत्री छगन भुजबळ, आमदार आदिती तटकरे, नवाब मलिक आणि समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत करण्यात आली. मात्र या नंतर अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीतील मोठा गट नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.

सूरज चव्हाण यांना पक्षाचे सरचिटणीस केल्यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील एक मोठा गट नाराज असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर दादांना मानणाऱ्या गटाची नाराजी असल्याचे समजते. लातूरमधील छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयसिंह घाडगे यांना मारहाणीच्या घटनेनंतर सूरज चव्हाण यांना इतक्या लवकर पदस्थापना दिल्यावरून पक्षातल्या दुसऱ्या फळीतील काही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे.

मराठवाड्यात पक्षाला फटका बसण्याची भीती

पक्षाच्या या नाराज गटाने आपली नाराजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याकडेही व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. पक्षात सुनील तटकरे समर्थक आणि अजितदादा समर्थक असा सुप्त संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अनेक निर्णयांमध्ये विश्वासात घेत नसल्याने पक्षातील नेते नाराज असल्याची माहिती ‘एबीपी माझा’ला सूत्रांकडून मिळत आहे. सूरज चव्हाण यांना सरचिटणीस करण्याच्या निर्णयाचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मराठवाड्यात पक्षाला फटका बसण्याची नाराज गटाला भीती आहे.

सुप्त संघर्ष उफाळण्याची शक्यता

सूरज चव्हाण यांना सरचिटणीस केल्यानंतर दुसऱ्या फळीतील नेत्यांसह पक्षाच्या काही फ्रंटल सेलच्या अध्यक्ष नाराज आहेत. या नेत्यांनी अनेक मुद्द्यांवर या आधीही अजित पवारांकडे केली होती. तटकरे यांच्या कार्यशैलीवरून तक्रार करण्यात आली होती. तसेच या नेत्यांनी पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवरून याआधी पक्षाध्यक्ष अजित पवारांकडे तक्रार केली होती. त्यामुळे सुनील तटकरे समर्थक आणि अजित पवार समर्थक यांच्यातील सुप्त संघर्ष पुढच्या काळात अधिक उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38

आणखी वाचा

Sunil Tatkare on Suraj Chavan : ‘मारकुट्या’ सूरज चव्हाणांची नियुक्ती का केली? प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी सगळंच सांगितलं; म्हणाले…

आणखी वाचा

Comments are closed.