NCP Ajit Pawar Faction Minister Dhananjay Munde absent shirdi party meeting


शिर्डी – राष्ट्रवादी काँग्रेसचे आजपासून (शनिवार) दोन दिवसीय अधिवेशन सुरु झाले आहे. येथील पुष्पक हॉटेलमध्ये अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनामध्ये पक्षाचा आगामी काळातील कार्यक्रम काय असणार यावर चर्चा होणार आहे. मात्र राष्ट्रवादीच्या या अधिवेशनात चर्चा होत आहे ती, धनंजय मुंडे यांच्या गैरहजेरीची आणि छगन भुजबळांच्या नाराजीची. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेमध्ये सध्या नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे. बीडमधील हत्या प्रकरण आणि हत्येचा मास्टरमाईंड समजला जाणारा वाल्मिक कराडसोबत मंत्री धनंजय मुंडे यांचे असलेले संबंध यामुळे धनंजय मुंडें अडचणीत आले आहे. अजित पवारांनी मुंडेंना मंत्रिपदाबद्दल अभय दिले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी त्यांचा काही संबंध नाही, असे ते म्हणत आहेत. मात्र धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे संबंध रोज नव्याने समोर येत आहे. यामुळे धनंजय मुंडे यांचा पाय अधिक खोलात चालला असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच मुंडेना पक्षातील कार्यक्रमामध्ये टाळले जात आहे का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमातही त्यांची अनुपस्थिती होती. त्यानंतर पक्षाच्या अधिवेशनालाही त्यांनी दांडी मारली आहे. त्यामुळे ही चर्चा अधिक होत आहे.

वाल्मिक कराडमुळे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शिर्डी येथे अधिवेशन सुरु झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीने हे अधिवेशन महत्त्वाचे मानले जात आहे. मात्र अधिवेशनात दोन नेत्यांच्या हजेरी आणि गैरहजेरीचीच चर्चा अधिक होत आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजित दादांचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला हत्येचा आरोपी करण्यात आले आहे. त्याच्यावर मकोकांतर्गत कारवाई सुरु करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंचे मंत्रिपद अडचणीत आले आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष अजित पवारांवर दबाव वाढत आहे. स्वपक्षीयांसह महायुतीतील घटक पक्ष आणि विरोधकांनी जोरदार आघाडी उघडली आहे. राजकीय नेत्यांसोबत सामाजिक क्षेत्रातील आणि आता मुंडेंच्या कुटुंबातील व्यक्तीही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही झाले आहेत. मंत्री मुंडेंच्या मामी सारंगी महाजन यांनी आज मृत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी धनंजय मुंडे यांनी नैतिकतेने मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता, तसेच आमदारकीचा राजीनामा देऊन बीडमधील दहशत संपवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असेही म्हटले आहे.

पक्षाच्या कार्यक्रमातून धनंजय मुंडेंची सलग दुसरी गैरहजेरी 

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला आज धनंजय मुंडे यांनी दांडी मारली आहे. प्रकृती बरी नसल्यामुळे अधिवेशनाला जाऊ शकत नसल्याचे मुंडेंच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मात्र एका आठवड्यात सलग ही दुसरी वेळ आहे जेव्हा धनंजय मुंडे हे पक्षाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच मुंबई दौरा झाला. यावेळी त्यांनी महायुतीतील सर्व आमदारांसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याआधी अजित पवारांनी धनंजय मुंडेंना परळीला पाठवले होते. परळमधील वातावरण शांत करण्यासाठी मुंडे परळीला गेले असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र दोन दिवस मंत्री मुंडे हे त्यांच्या फार्महाऊसवरच मुक्कामाला होते.

धनंजय मुंडे हे स्वतःहून सार्वजिनक कार्यक्रम टाळत आहेत की, पक्षाकडूनच त्यांना तसे आदेश दिले गेले आहेत, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे.

हेही वाचा : Chhagan Bhujbal : श्रद्धेने काम करुन अश्रद्ध पद्धतीने वागणार असतील तर काय करावे; शिर्डीतून निघताना भुजबळांचा सवाल



Source link

Comments are closed.