Ncp ajit pawar faction party meeting at shirdi ajit pawar speech on local body election
शिर्डी – राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला एक महिना झाल्यानंतर पालकमंत्र्यांची निवड झाली आहे. आपेक्षेप्रमाणे पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे आले आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे जिल्ह्यातील गुंडगिरी, वाळू माफिया, राख माफिया, पीकविमा माफिया असे विविध आरोप परळी आणि बीड जिल्ह्यातील नेतृत्व मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ‘नवसंकल्प शिबिर’ शिर्डीमध्ये होत आहे. या शिबिराच्या दुसऱ्या दिवशी मंत्री धनंजय मुंडे शिर्डीत पोहचले. यावेळी त्यांनी भाषणही केले. तर पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अजित पवारांनी पक्षाची पुढील रणनीती कशी असेल याचे सुतोवाच केले तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना पक्षात थारा दिला जाणार नाही. पक्षाला कमीपणा यायला नको. जनमाणसात प्रतिमा खराब असलेल्या व्यक्तीला पक्षात स्थान नको. चुकीचं काम करणाऱ्याची हकालपट्टी केली जाईल, असा सज्जड दमही त्यांनी दिला आहे.
अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना अभय देत त्यांचे मंत्रिपद वाचवले. मात्र त्यानंतरही विरोधक आग्रकम आहेत. आजच्या भाषणात धनंजय मुंडे यांनी त्यांची स्पष्ट भूमिका मांडली. वाल्मिक कराडसोबत कोणतेही आर्थिक संबंध नाही, असा दावाही मुंडेंनी केला. मला टार्गेट करुन अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण मी अभिमन्यू नाही तर अर्जुन आहे, असे सांगत त्यांनी बीडमधील गु्न्हेगारीशी काही संबंध नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. यावर अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात धनंजय मुंडे यांनी त्यांच्याविरोधात उठलेले वादळ आजच्या भाषणाने शांत केले असे म्हणत त्यांचे कौतूकही केले.
कायदा-सुव्यवस्थेच्या आरोपांवरुन दादांचा विरोधकांना टोला
अजित पवारांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरुन होत असलेल्या आरोपांवरुन विरोधकांवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, मुंबईत वांद्रे भागात श्रीमंत लोक राहातात असे चोरट्याला कोणी तरी सांगितले. त्याने सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला. यावरुन लगेच लोक सुरु झाले, मुंबईतील कायदा-सुव्यवस्था ढासळली. कुठे तरी एक चोरीची घटना घडली म्हणजे कायदा सुव्यवस्था ढासळली? असा उपरोधिक सवाल त्यांनी विरोधकांना केला. पोलीस सैफ अली प्रकरणात कामाला लागली आणि काल रात्री तो पठ्ठ्या पकडला गेला आणि त्याने सगळी कबुली दिली असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
हेही वाचा : Shiv Sena (UBT) : बांगलादेशी भारतात घुसून गु्न्हे करतो हे केंद्रीय गृहमंत्रालयाचे अपयश: आदित्य ठाकरेंची टीका
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणनीती
अजित पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अव्वल असला पाहिजे असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. ते म्हणाले की, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने जे इच्छुक आहेत त्यांनी एक जबाबदार कार्यकर्ता निवडला पाहिजे आणि 25 घरांवर काम केल पाहिजे. म्हणजे एका घरात 4 मतं धरली तर 100 मतं मिळतील. महापालिकेत चार वॉर्डाचा एक प्रभाग असेल. प्रभागात प्रत्येक उमेदवाराने 50 कार्यकर्ते तयार केले तर आपण 20 हजार मतापर्यंत पोहोचू शकतो. प्रत्येकाने 100 मतांपर्यंत पोहोचायचे आहे. अधिकाधिक तरुणांना पक्षात आणायचं आहे. डॉक्टर, इंजिनिअर, वकील यांना पक्षात आणायचं आहे. राज्यातील प्रत्येक गावात, चौकात झेंडा लागेल, पक्षाचा बोर्ड लागेल याची काळजी घेतली पाहिजे. गावागावात कार्यकर्ता तयार होईल, यासाठी प्रयत्न करायला हवेत. घरातला कार्यकर्ता बाहेर पडतो, त्यावेळी तो एक पक्षात, बायको वेगळ्या पक्षात, पोरगा तिसऱ्या पक्षात आणि लेक अपक्ष आणि त्या सगळ्यांच्या विरोधात भावकी असं व्हायला नको, असंही अजित पवार म्हणाले.
दादांनी पंतप्रधानांना विचारले किती वाजता उठता?
उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहाटेच कामाला सुरुवात करतात ही त्यांची ख्याती आहे. मात्र त्यांना उत्सूकता होती की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी किती वाजता उठतात. याबद्दलही अजित दादांनी यावेळी सांगितले, ते म्हणाले की पंतप्रधान मोदींना विचारले की, सकाळी किती वाजता उठता. ते म्हणाले मी साडे तीन तास झोपतो. योगा करतो आणि शरीराला वेळ देतो. तसेच सर्व कुटुंबाची तपासणी करून घ्या, असं त्यांनी मला सांगितलं. मी देखील तुम्हाला हेच सांगतो की, आपले आरोग्य तपासून घ्या, असा काळजीचा सल्लाही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.
हेही वाचा : Shiv Sena : रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन राडा; गोगावले समर्थकांनी रोखला मुंबई-गोवा महामार्ग
Comments are closed.