भाजपने कुटुंब कल्याण योजना राबवली, त्यांच्याच जागा बिनविरोध कशा होतात? रोहित पवारांचा हल्लाबोल
रोहित पवार भाजपवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. काही ठिकाणी नगरपरिषदेच्या आणि नगरपंतायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तर काही ठिकाणी रंगतदार लढती होत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही ठिकाणच्या नगरपरिषदेत भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून गेले आहेत. याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शऱद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर टीका केलीय. बिनविरोध निवडणुका होत आहेत ही चांगली गोष्ट आहे, परंतु भाजपच्याच जागा बिनविरोध कशा होत आहेत? असा सवाल रोहित पवारांनी केलाय.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मामेभाऊ श्री प्रल्हाद कलोती यांची चिखलदरा नगरपरिषदेच्या नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या पत्नी सौ. साधनाताई महाजन यांची जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, मंत्री जयकुमार रावल जी यांच्या मातोश्री सौ नयनकुवर ताई रावल यांची दोंडाइचा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. बिनविरोध निवडणुका होत आहेत ही चांगली गोष्ट आहे, परंतु भाजपच्याच जागा बिनविरोध कशा होत आहेत? हा प्रश्न आहे. साम-दाम-दंड-भेद वापरून लोकशाहीचा गळा घोटला जात नसेल ही अपेक्षा असल्याचे रोहित पवारांनी म्हटलं आहे.
घराणेशाहीवरून आरोप करणाऱ्या भाजपने कुटुंब कल्याण योजना राबवली
घराणेशाहीवरून आरोप करणाऱ्या भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘कुटुंब कल्याण योजना’ राबवत पक्षाच्या ‘तळागाळातल्या कार्यकर्त्यांना’ ‘न्याय’ देऊन पक्षांतर्गत ‘लोकशाही’ ‘मजबूत’ करत आपला पक्ष कसा #PARTY_WITH_DIFFERANCE आहे हे दाखवून दिल्याच टोला देखील रोहित पवारांनी लगावला आहे. असो, वर्षानुवर्षे भाजपासाठी काम करणाऱ्या केशव उपाध्ये, माधव भंडारी यांच्यासारख्या निष्ठावंतांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असेही रोहित पवार म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कुठे महायुतीतील पक्ष आमने सामने आहेत तर कुठे महाविकास आघाडीमध्ये देखील लढती असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, काही ठिकाणच्या जागा या बिनविरोध देखील झाल्या आहेत. अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार बिनविरोध झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शऱद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर टीका केलीय
महत्वाच्या बातम्या:
जामनेरमध्ये 9 उमेदवार बिनविरोध, 15 जागांवर होणार लढत तर मुक्ताईनगरमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट सामना
आणखी वाचा
Comments are closed.