NCP Sharad Pawar Group MLA Satish Chavan will return to Ajit Pawar NCP
विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणारे आमदार सतीश चव्हाण पुन्हा घरवापसी करणार आहेत. ज्यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणारे आमदार सतीश चव्हाण पुन्हा घरवापसी करणार आहेत. ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते उद्या शनिवारी (ता. 18 जानेवारी) अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, जेव्हा सतीश चव्हाणांनी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी सोडली होती, तेव्हा त्यांचे पक्षाकडून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले होते. पण आता हे निलंबन मागे घेण्यात आले आहे. (NCP Sharad Pawar Group MLA Satish Chavan will return to Ajit Pawar NCP)
सतीश चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांना रामराम ठोकून गंगापूर खुलताबाद मतदारसंघातून निवडणूक लढण्याकरिता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून अजित पवार गटाने त्यांची हकालपट्टी केली होती. परंतु, आता निवडणूक निकालानंतर केवळ दोन महिन्यांमध्येच त्यांनी पुन्हा अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. सतीश चव्हाण शनिवारी अजित पवार यांच्या शिर्डीतील मेळाव्यात जाहीर प्रवेश करतील, अशी माहिती समोर आली आहे. तर त्यांच्या पक्ष प्रवेशाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे.
हेही वाचा… Praniti Shinde : निवडणुकीत झालेल्या जातीच्या राजकारणावरून प्रणिती शिंदेंनी व्यक्त केली खंत
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, सतीश चव्हाण यांनी 15/10/2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस व महायुती सरकारच्या विरोधात प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने पक्षविरोधी भूमिका घेतली म्हणून 6 वर्षांसाठी त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलेले होते. सतीश चव्हाण यांनी 13/01/2025 रोजी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वावर व पक्षाच्या ध्येय धोरणावर विश्वास व्यक्त करून पक्षाचे काम प्रामाणिकपणे करण्याचे समक्ष सांगितले असल्याने त्यांचे 6 वर्षासाठीचे निलंबन रद्द करण्यात येत आहे. सतीश चव्हाण हे 2008 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मराठवाडा पदवीधर मतदार संघातून विधान परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
Comments are closed.