NCP statement regarding Dhananjay Munde’s resignation
संतोष देशमुख हत्या प्रकरण न्यायालयीन असून तपास सुरू असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही. परंतु, कोणत्याही गुन्ह्याला, गैरकृत्याला पक्षाचे किंवा आमच्या नेत्यांचे कधीही समर्थन असणार नाही.
(NCP) मुंबई : गेले सुमारे तीन महिने राज्यात गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून विरोधकांसह सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी अन्न आणि नागरीपुरवठा मंत्रिपदाचा आज, मंगळवारी राजीनामा दिला. सदसद्विवेकबुद्धीला स्मरून तसेच, प्रकृतीच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने मुंडे यांचा राजीनामा आणि आपली भूमिका स्पष्ट करणारे एक निवेदन सोशल मीडियावर शेअर केले आहे. (NCP statement regarding Dhananjay Munde’s resignation)
संतोष देशमुख हत्याप्रकरणात परळी नगर परिषदेचा माजी नगराध्यक्ष वाल्मीक कराड याचाही कथित सहभाग असल्याचा आरोप आहे. वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती म्हणून ओळखला जातो. म्हणूनच सर्वपक्षीयांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागमी लावून धरली होती. आज, मंगळवारी अखेर मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्याअनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते, संतोष देशमुख हत्याप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे. या प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय सुरू आहे आणि तो असाच चालू राहून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही आमची अपेक्षा आहे.
श्री. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावरती दिलेल्या राजीनामाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनीलजी तटकरे यांनी जारी केलेले पत्रक @SunilTatkare pic.twitter.com/ZxgvO2qnLe
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) March 4, 2025
हे प्रकरण न्यायालयीन असून तपास सुरू असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे उचित ठरणार नाही. परंतु, कोणत्याही गुन्ह्याला, गैरकृत्याला पक्षाचे किंवा आमच्या नेत्यांचे कधीही समर्थन असणार नाही. न्याय व्यवस्था आणि कायदा यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या कामात आम्ही कधीही हस्तक्षेप करणार नाही. न्यायाला विलंब होऊ नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी संबंध आहे असे तपासात समोर आलेले नाही. मात्र नैतिकतेच्या मुद्यावर एक जबाबदार राजकीय नेता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याआधी नैतिक मुद्यांवर राजीनामा देण्याचे उदाहरण निर्माण केले होते आणि या प्रकरणातही त्यांनी तशीच ठाम भूमिका घेतली होती. आजच्या घटनेतून हाच संदेश राज्याला गेला आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा – Chitra Wagh : सदसद्विवेक बुद्धीने राजीनामा देणाऱ्या मुंडेंना चित्रा वाघ म्हणतात, चुकीला माफी नाही…
Comments are closed.