बिहारमध्ये एनडीएचा 'क्लीन स्वीप'

राज्यसभा निवडणुकीत पाचही जागांवर विजय

वृत्तसंस्था / पाटणा

बिहारमधील राज्यसभा निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सर्व पाच जागा जिंकून ‘क्लीन स्वीप’ नोंदविला आहे. विरोधात असलेल्या काँग्रेसचे 3 आणि राष्ट्रीय जनता दलाचा एक, असे एकंदर चार आमदार मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहिल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाचवी जागा जिंकणेही शक्य झाले. या आघाडीच्या चार जागा सुनिश्चित होता. तथापि, विरोधकांच्या मतांमध्ये फूट पडल्याने तो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल आपल्या आमदारांवर कारवाई करणार का, असा प्रश्न आहे. राज्यसभा निवडणुकांच्या या फेरीनंतर सभागृहात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी या सत्ताधाऱ्यांचे बळ मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

या निवडणुकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे मतगणनेच्या प्रथम फेरीतच विजयी झाले. दोन्ही नेत्यांना प्रत्येकी सर्वाधिक 44 मते मिळाली. प्रत्येकी 42 मते मिळवत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राम नाथ ठाकूर आणि राष्ट्रीय लोकमोर्चाचे उपेंद्रसिंग कुशवाह हे देखील प्रथम फेरीतच विजयी झाले. पाचवे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे शिवेश राम यांना प्रथम फेरीत 30 मते पडली. मात्र, मतगणनेच्या दुसऱ्या फेरीत आघाडी घेऊन त्यांनीही विजय प्राप्त केला. या निवडणुकीत विरोधी पक्षांचा एकत्रितरित्या एक उमेदवार निवडून येईल, अशी स्थिती होती. तथापि, कोणतीही पूर्वसूचना न देता काँग्रेसचे 3 आणि राष्ट्रीय जनता दलाचा 1, असे विरोधकांचे चार आमदार अनुपस्थित राहिल्याने विरोधकांचे बळ तोकडे पडल्याचे दिसून आले.

अशी झाली मतविभागणी

या निवडणुकीत प्रथम फेरीत निवडून येण्यासाठी 41 मतांची आवश्यकता होती. भारतीय जनता पक्षाकडे 89 जागा असल्याने या पक्षाच्या 2 जागा सहज निवडून येणार होत्या. संयुक्त जनता दलाकडे 85 जागा असल्याने या पक्षाच्या दोन जागाही निश्चित होत्या. या दोन्ही पक्षांकडे मिळून 10 मते अधिकची होती. याशिवाय, लोकजनशक्ती आणि दोन छोट्या पक्षांची मते अशी मिळून 28 ही रालोआकडे होती. विरोधकांच्या सर्व आमदारांनी त्यांच्या संयुक्त उमेदवाराला मतदान केले असते, तर तो निवडून येण्याची शक्यता होती. तथापि, विरोधकांचे चार आमदार ऐनवेळी अनुपस्थित राहिल्याने विरोधकांचा मोठा पराभव झाला आहे.

ओडीशातही भाजपचा लाभ

विरोधकांची मते फुटण्याचा प्रकार ओडीशातही घडला. राज्यसभेच्या चार जागांपैकी तीन जागांवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले. वास्तविक या पक्षाच्या दोन जागा सुनिश्चित होत्या. मात्र, विरोधकांची आठ मते फुटल्याने भारतीय जनता पक्षाचा आणखी एक उमेदवार निवडून आला. विजयी उमेदवारांची नावे मनमोहन समल, सुजीत कुमार आणि दिलीप रे अशी आहेत. चौथी जागा बिजू जनता दलाचे संतृप्त मिश्रा यांनी जिंकल्याची माहिती दिली गेली.

सव्वीस जागा निर्विरोध

दहा राज्यांमधून निवडून येणाऱ्या 37 राज्यसभा जागांसाठी सोमवारी मतदान होईल, अशी घोषणा करण्यात आली होती. तथापि, महाराष्ट्रातील सर्व सात जागा निर्विरोध निवडल्या गेल्या. तामिळनाडूतही निवडणूक निर्विरोध झाली. अशा प्रकारे एकंदर, 37 पैकी 26 जागा निर्विरोध निवडून आल्या होत्या. परिणामी, सोमवारी 11 जागांसाठी मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.  त्यानंतर त्वरित मतगणना पार पडून सर्व निर्णयांची घोषणा करण्यात आली आहे.

 

Comments are closed.