NED vs NEP: T20I क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडलं असं, एका सामन्यात 3 सुपर ओव्हर, 'ही' टीम ठरली विजेती

सध्या स्कॉटलंड, नेपाळ आणि नेदरलँड्स या संघांमध्ये टी-20 तिरंगी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात एक ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळाले. टिटवुड मैदानावर नेपाळ आणि नेदरलँड्स यांच्यात खेळलेला हा सामना पहिल्यांदा बरोबरीत सुटला. त्यानंतर सामन्याचा निकाल मिळविण्यासाठी 3-3 सुपर ओव्हर्स खेळवण्यात आले. टी-20 क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात तीन सुपर ओव्हर्स खेळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना, नेदरलँड्सच्या संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 152 धावा केल्या. या सामन्यात नेपाळच्या फिरकीपटूंनी शानदार कामगिरी केली, विशेषतः संदीप लामिछानेने या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्याने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये 18 धावा देऊन 3 विकेट घेतल्या. नेदरलँड्सकडून तेजा निदामानुरू सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने 35 धावांचे योगदान दिले.

प्रत्युत्तरात, नेपाळच्या संघानेही 20 षटकांत 8 गडी गमावून 152 धावा केल्या, ज्यामुळे सामना बरोबरीत सुटला. कुशल भुर्तेल (34) आणि रोहित पौडेल (48) यांनी संघाकडून चांगली फलंदाजी केली. नंदन यादवने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून सामना बरोबरीत सोडवला, ज्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. डॅनियल डोराम हा नेदरलँड्सचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता, त्याने आपल्या चार षटकांत 14 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या.

सुपर ओव्हरबद्दल बोलायचे झाले तर, नेपाळने प्रथम फलंदाजी केली आणि पहिल्या सुपर ओव्हरमध्ये 19 धावा केल्या. पण नेदरलँड्स संघानेही प्रत्युत्तरात 19 धावा केल्या, अशा प्रकारे पहिला सुपर ओव्हरही बरोबरीत सुटला. यानंतर दुसरा सुपर ओव्हर खेळवण्यात आला, जिथे दोन्ही संघांनी 17-17 धावा केल्या. अशा परिस्थितीत दुसरा सुपर ओव्हरही बरोबरीत सुटला. दोन सुपर ओव्हर बरोबरीत आल्यानंतर, या सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला होता. तिसऱ्या सुपर ओव्हरबद्दल बोलायचे झाले तर, नेपाळने एकही धाव न काढता दोन्ही विकेट गमावल्या. त्यानंतर, नेदरलँड्सने पहिल्याच चेंडूवर षटकार मारून सामना जिंकला.

Comments are closed.