66 व्या वर्षी नीना गुप्ता गरोदर? अभिनेत्रीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, मला आनंद होतोय की…
बॉलीवूडची ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता सध्या एका भलत्याच कारणांमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर नीना गुप्ता यांचे काही फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोंना पाहून त्या वयाच्या 66 व्या वर्षी गरोदर असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली आहे. अखेर नीना गुप्ता यांनी या चर्चांवर मौन सोडले असून आपल्या खास विनोदी शैलीत या अफवांना पूर्णविराम दिला आहे. “आता फक्त खऱ्या आयुष्यात ‘बधाई हो’ मिळणेच बाकी होते,” असे म्हणत मिश्कील प्रतिक्रीया दिली आहे.
अलीकडेच साऊथची सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी आपली लग्नगाठ बांधली. यानंतर या दोघांनी एका रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला नीना गुप्ता यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात नीना गुप्ता यांनी पांढऱ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली होती. या सोहळ्यातील त्यांचे काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर, नेटकऱ्यांनी त्यांच्या पोटाचा आकार पाहून त्या प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरू केल्या. काही युजर्सनी तर चक्क ‘रिअल लाईफ बधाई हो’ म्हणत कमेंट्सचा वर्षाव केला होता.
सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरणाऱ्या या अफवावंर नीना गुप्ता यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या की, “मी प्रेग्नंट नाहीये. खरं तर मी त्या दिवशी जी साडी नेसली होती, तिचे कापड खूप जाड होते. त्यामुळे मी त्या फोटोंमध्ये थोडी जाड दिसत होते, पण लोकांनी त्याचा भलताच अर्थ काढला.” आपल्या वयातील गरोदरपणाच्या चर्चांवर त्यांनी नाराजी व्यक्त न करता उलट कौतुक केले. “या वयातही लोक माझ्या प्रेग्नेंसीबद्दल चर्चा करत आहेत, हे पाहून मला आनंद होतोय. यावरून आपला देश आणि विचारसरणी प्रगत होत असल्याचे दिसून येते,” असे त्या मिश्किलपणे म्हणाल्या.
नीना गुप्ता यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे. 80 च्या दशकात वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांच्यासोबतच्या नात्यातून त्यांनी मुलगी मसाबा गुप्ता हिला जन्म दिला आणि एकटीने तिचा सांभाळ केला. त्यानंतर 2008 मध्ये त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट विवेक मेहरा यांच्याशी लग्न केले. आता 66 व्या वर्षी पसरलेल्या या ‘गुड न्यूज’च्या अफवांना नीना यांनी ज्या पद्धतीने हाताळले, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments are closed.