जगज्जेतेपद राखण्याचे नीरजपुढे आव्हान, आजपासून टोकियोत जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकीचे द्वंद्व

जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकीत जगज्जेती कामगिरी करणारा सुपरस्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आपले जेतेपद राखण्यासाठी सज्ज झाला आहे. बुधवारी तो पात्रता फेरीपासून आपल्या जेतेपद राखण्याच्या मोहिमेचा प्रारंभ करणार आहे. त्याच्यासमोर ऑलिम्पिक सुवर्णविजेता अर्शद नदीम व जर्मनीचा डायमंड लीग विजेता जुलियन वेबर यांचे कडवे आव्हान असेल.
आपले सुवर्णपदक राखण्याचे ध्येय उराशी बाळगूनच नीरज टोकियोत दाखल झाला आहे. भालाफेकीच्या इतिहासात आतापर्यंत दोन खेळाडूंना सलग सुवर्ण जिंकण्यात यश लाभले आहे. या सोनेरी पंक्तीत नीरजला आपलेही नाव कोरायचे आहे. 2023 मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद त्याने सर्वोत्तम भालाफेक करत सुवर्ण पदकाचे चुंबन घेतले होते. झेक प्रजासत्ताकचा दिग्गज आणि सध्या नीरजचा प्रशिक्षक असलेला जॉन जेलेंजी (1993, 1995) आणि ग्रेनेडाचा अॅण्डडरसन पीटर्स (2019, 2022) यांनाच आतापर्यंत सलग दोन वेळा हे यश मिळवण्यात यश लाभले आहे.
तसेच पॅरिस ऑलिम्पिकनंतर नीरज प्रथमच सुवर्ण विजेत्या नदीमशी भिडणार आहे. पॅरिसमध्ये नदीमने 92.97 मीटरच्या भालाफेकीसह सुवर्ण जिंकले होते, तर नीरजचा सर्वोत्तम थ्रो 89.45 मीटर इतका राहिला व त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र पात्रता फेरीत या दोन्ही खेळाडूंना वेगवेगळय़ा गटात ठेवण्यात आले असल्याने त्यांची थेट लढत होणार नाही. मात्र गुरुवारी होणाऱया अंतिम फेरीत नीरजला सर्वोत्तम भालाफेक करत पॅरिसचे अपयश पुसून काढण्याची संधी लाभणार आहे.
27 वर्षीय नीरज सोनेरी इतिहास रचण्यासाठी सज्ज असला तरी हे आव्हान सोपे नाही. हे तेच स्टेडियम आहे जिथे त्याने 2021 मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली होती. मे महिन्यात दोहा डायमंड लीगमध्ये त्याने 90.23 मीटर भालाफेक करत प्रथमच 90 मीटर फेकीचा पराक्रम केला होता. मात्र या वर्षी अन्य काही स्पर्धांमध्ये त्याचे प्रदर्शन सामान्य राहिले असून दोनदा तो 85 मीटरच्याही पुढे जाऊ शकला नाही. नीरज या हंगामात दुसऱया क्रमांकाची सर्वोत्तम फेक 88.16 मीटर इतकी आहे.
फॉर्मच्या दृष्टीने जर्मनीचा वेबर सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. या 31 वर्षीय खेळाडूने या हंगामात तीन वेळा 90 मीटरपेक्षा अधिक अंतरावर भाला फेक केली आहे. मागील महिन्यात डायमंड लीग ट्रॉफी जिंकून त्याचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. त्यामुळे नीरजसमोर वेबरपेक्षा सर्वोत्तम फेक करण्याचे आव्हानही असेल.
Comments are closed.