डायमंड लीगमध्ये सोनं जिंकण्यासाठी नीरज सज्ज

हिंदुस्थानचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने यंदाच्या डायमंड लीगच्या फायनलसाठी पात्रता मिळवली आहे. ही स्पर्धा स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे 27 आणि 28 ऑगस्टला पार पडणार आहे. विद्यमान जगज्जेता असलेल्या नीरजने 16 ऑगस्टला पोलंडमधील सिलेसिया डायमंड लीग स्पर्धेत भाग घेतला नव्हता. तसेच 22 ऑगस्टला बुसेल्समध्ये होणाऱ्या पुढील टप्प्यातही नीरजच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.

गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी नीरज

सिलेसिया टप्प्यानंतर जाहीर झालेल्या गुणतालिकेनुसार नीरज चोप्राने डायमंड लीगच्या फायनलसाठी जागा निश्चित केली आहे. नीरजने यंदा दोन डायमंड लीग स्पर्धांत भाग घेतला असून, त्याच्या खात्यात 15 गुण आहेत आणि तो सध्या तिसऱया स्थानी आहे. एका स्पर्धेत तो पहिल्या क्रमांकावर राहिला होता, तर दुसऱया स्पर्धेत उपविजेता ठरला होता.

नीरजचा यशस्वी हंगाम

नीरजने 5 जुलैला बंगळुरूमध्ये झालेल्या ‘नीरज चोप्रा क्लासिक’मध्ये अखेरची स्पर्धा खेळली होती. या स्पर्धेत त्याने 86.18 मीटरचा भालाफेक करीत विजेतेपद पटकाविले होते. यंदाचा हंगाम त्याच्यासाठी अत्यंत यशस्वी ठरला आहे. मे महिन्यात दोहा डायमंड लीगमध्ये त्याने कारकीर्दीतील सर्वोत्पृष्ट 90.23 मीटरचा फेक करत बहुप्रतीक्षित 90 मीटरचा टप्पा पार केला होता. त्या स्पर्धेत तो वेबरनंतर दुसऱया स्थानावर राहिला होता. यानंतर जूनमध्ये पॅरिस डायमंड लीगमध्ये नीरजने 88.16 मीटरची फेक करत प्रथम स्थान पटकावले होते. आता नीरज 13 ते 21 सप्टेंबरदरम्यान टोकियोत होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आपला किताब राखण्यासाठी उतरणार आहे.

Comments are closed.