नीटची पुनर्परीक्षा कडेकोट बंदोबस्तात देशभरात पार पडली.

कडक नियमांचा काही विद्यार्थ्यांना फटका : आता निकालाची उत्सुकता

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) रविवार, 21 जून रोजी देशभरातील 564 शहरांमध्ये नीट-यूजी परीक्षा यशस्वीरित्या पार पाडली आहे. परीक्षा सुरक्षित आणि निष्पक्ष व्हावी यासाठी, एनटीए आणि केंद्र सरकारने अनेक कठोर नियम लागू केले होते. नीट परीक्षेसाठी देशभरात 2 लाखांहून अधिक सुरक्षा आणि परीक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. एनटीएने नीट-यूजी पुनर्परीक्षा इंग्रजी आणि हिंदीसह 12 भारतीय भाषांमध्ये घेतली आहे. या परीक्षेत एकूण 22.79 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. ही परीक्षा रविवारी दुपारी 2 ते सायंकाळी 5.15 या वेळेत घेण्यात आली. आता विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे.

नीट-यूजी 2026 ची पुनर्परीक्षा देशभरात दुपारी 2 वाजता सुरू झाली. देशभरातील 551 शहरांमधील आणि परदेशातील 14 शहरांमधील 5,440 केंद्रांवर 22.79 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देत होते. ही परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 पर्यंत चालली. विद्यार्थ्यांना सकाळी 11 ते दुपारी 1:30 पर्यंत परीक्षा केंद्रांमध्ये प्रवेश देण्यात आला. मुंबईतील दोन आणि बेंगळूरमधील चार विद्यार्थ्यांना एक-दोन मिनिटे उशिरा आल्याने प्रवेश नाकारण्यात आला. बेंगळूरमध्ये मुलींनी आत जाण्यासाठी रेलिंगवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला, परंतु परीक्षा कक्षाचे गेट बंद होते. राजस्थानमधील अजमेर येथील एका केंद्रावर हिजाब घातलेल्या एका विद्यार्थिनीला प्रवेश नाकारण्यात आला. बऱ्याच चर्चेनंतर तिला आत सोडण्यात आले. उदयपूरमध्ये एका उमेदवाराची नाकातील नथ तशीच ठेवून नाकाला टेप चिकटवण्यात आली. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये विद्यार्थ्यांचे जानवे कापून काढण्यात आले. उत्तर प्रदेशात मुलींचे कानातले दागिनेही काढण्यात आल्याचे प्रकार निदर्शनास आले.

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर झालेल्या पुनर्परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, आशा आणि चिंतेचे संमिश्र वातावरण दिसून आले. आम्ही पुन्हा एकदा कसून तयारी केली असून यावेळी चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे, असे परीक्षा केंद्रांवर आलेल्या बहुतेक उमेदवारांनी सांगितले. तथापि, कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पुन्हा रद्द करू नये, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली. कारण सततची अनिश्चितता आणि पुनर्परीक्षेमुळे त्यांचा मानसिक ताण वाढला आहे.

सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन

गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांनी केवळ उजळणीवर लक्ष केंद्रित केले आहे आणि आता त्यांचा निकाल परीक्षेच्या पातळीवर अवलंबून असेल. दरम्यान, काही पालक आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवरील व्यवस्था पूर्वीपेक्षा चांगली असल्याचे वर्णन केले. कठीण परिस्थितीतही सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा आणि धीर सोडू नये, असे विद्यार्थ्यांनी सहकारी उमेदवारांना आवाहन केले.

हैदराबादमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या

दरम्यान, हैदराबादमध्ये एका 19 वर्षीय नीट विद्यार्थिनीने आत्महत्या केली. रविवारी सकाळी तिच्या अपार्टमेंटमध्ये तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पुनर्परीक्षेच्या दबावामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांना संशय आहे. घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये विद्यार्थिनीने तिच्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरलेले नाही.

दोन लाखांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात

फेरपरीक्षेसाठी देशभरातील परीक्षा केंद्रांवर दोन लाखांहून अधिक सुरक्षा कर्मचारी, 674 शहर समन्वयक आणि 6,669 निरीक्षक तैनात करण्यात आले होते. प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून प्रथमच भारतीय हवाई दलाची विमाने आणि हेलिकॉप्टर्स वापरण्यात आली. हवाई दलाने देशभरातील विविध विभागांमध्ये नीट-यूजीच्या प्रश्नपत्रिका पोहोचवण्यासाठी 200 हून अधिक फेऱ्या केल्या आहेत. एनटीएच्या माहितीनुसार, 95,000 हून अधिक परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही पाळत ठेवण्यात आली. एकूण 1,38,560 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. राष्ट्रीय, राज्य आणि मंत्रालय स्तरावर त्यांचे निरीक्षण केले जात होते. इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेप रोखण्यासाठी 51,311 जॅमर्स सक्रीय करण्यात आले होते.

दिल्ली विमानतळावर पंतप्रधान 45 मिनिटे थांबले

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी दुपारी 1:15 वाजता कोलकाताहून दिल्ली विमानतळावर दाखल झाले. मात्र, तात्काळ आपल्या निवासस्थानी जाण्याऐवजी ते 45 मिनिटे विमानतळावरच थांबले. नीट पुनर्परीक्षा दुपारी 2 वाजता सुरू होणार होत्या. वाहतुकीत कोणताही अडथळा येऊ नये आणि विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास कोणतीही अडचण येऊ नये, हे सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधान दुपारी 2 वाजल्यानंतरच विमानतळावरून निघाले.

Comments are closed.