KP Sharma Oli resign – पंतप्रधान केपी ओली शर्मा यांचा अखेर राजीनामा, Gen-Z च्या हिंसक आंदोलनानंतर नेपाळमध्ये सत्तांतर

नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावरील बंदीनंतर नेपाळमध्ये हिंसक आंदोलन सुरू झाले आहे. सोमवारी मध्यरात्री ही बंदी मागे घेण्यात आली असली तरी आंदोलकांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत मंगळवारीही काठमांडूमध्ये दगडफेक, जाळपोळ केली. अखेर GEN-Z च्या रेट्यापुढे केपी शर्मा ओली यांना झुकावे लागले आणि त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर ते दुबईला पळ काढण्याची शक्यता आहे.

सोमवारी रात्री कॅबिनेट बैठकीनंतर सोशल मीडियावरील बंदी मागे घेण्यात आली. मात्र या निर्णयानंतरही आंदोलक शांत झाले नाहीत. उलट आंदोलन आणखी तीव्र झाले आणि संपूर्ण काठमांडूवर आंदोलकांनी कब्जा मिळवला. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या निवासस्थानावर आंदोलकांनी कब्जा करत तोडफोड, जाळपोळ केली. यावेळी आंदोलकांनी पोलिसांवरही दगडफेक केली.

नेपाळमध्ये सुरू आंदोलनाला राजकीय समर्थनही मिळत आहे. अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. एवढेच नाही तर राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीच्या 21 खासदारांनीही सामूहिक राजीनामा दिला. रवि लामिछाने यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने संसद भंग करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.

Comments are closed.