Nepal Protest – हिंसाचारात काठमांडूतील 5 अब्जांचं 5 स्टार हिल्टन हॉटेल उद्धवस्त

नेपाळमध्ये मंगळवारी झालेल्या हिंसाचारादरम्यान आंदोलकांनी नेपाळला आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर ओळख मिळवून देणाऱ्या काठमांडूतील हिल्टन हॉटेललाही आग लावली. हिल्टन हे काठमांडूचे सर्वात उंच 5 स्टार हॉटेल आहे. हे हॉटेल बांधण्यासाठी एकूण 5 अब्ज हिंदुस्थानी रुपये खर्च झाले. गेल्या वर्षी जुलैमध्ये य हॉटेलचे बांधकाम पूर्ण झाले. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यात आधुनिक सुविधा होत्या. या हॉटेलने नेपाळला आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर ओळख दिली.
हिल्टन हॉटेल व्यतिरिक्त, आंदोलकांनी भाटभटेनी सुपरमार्केट, एनसेल, सीजी इलेक्ट्रॉनिक्स, ग्लोबल कॉलेज, उलेन्स स्कूल, सुझुकी शोरूम आणि सेंट्रल बिझनेस पार्क यासारख्या कॉर्पोरेट उद्योगांना आग लावली. विराटनगर आणि इटहरी येथील राष्ट्रीय वाणिज्य बँक, हिमालयीन बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि ग्लोबल आयएमई बँकेच्या वाहने, शाखांचीही तोडफोड करण्यात आली.
सिंह दरबार, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपतींचे निवासस्थान यासह डझनभर सरकारी आणि खाजगी इमारतींना आंदोलकांनी आग लावली. यामुळे नेपाळमधील अब्जावधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या नुकसानीकरीता विमा कंपन्यांकडे 31 अब्ज हिंदुस्थानी रुपयांपेक्षा जास्त दावा येण्याचा अंदाज विमा कंपन्यांनी व्यक्त केला आहे. 2015 मध्ये झालेल्या भूकंपापेक्षा हे नुकसान तिप्पट आहे. हा नेपाळसाठी सर्वात वाईट काळ असल्याचे विमा कंपन्या आणि बँकर्सचे म्हणणे आहे. एनआयए आणि नेपाळ राष्ट्र बँक संयुक्तपणे नुकसानीची माहिती गोळा करत आहेत.
Comments are closed.