Nepal Protest – हिंसक आंदोलनात माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू, घर पेटवलं

नेपाळमधील आंदोलन दिवसेंदिवस अधिकच हिंसक बनत आहे. आंदोलकांनी मंगळवारी नेपाळचे माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांचं घर पेटवलं. या आगीत खनाल यांच्या पत्नी राजलक्ष्मी चित्रकार यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना खनाल यांच्या दल्लू स्थित निवासस्थानी घडली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी घराला आग लावली तेव्हा राजलक्ष्मी या मुलगा निर्भीक खनालसह घरी होत्या. आगीत राजलक्ष्मी या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्याबद्दल अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. घराला आग लागण्यापूर्वी झलनाथ खनाल यांना नेपाळ आर्मीने वाचवले.

झलनाथ खनाल हे नेपाळचे 35 वे पंतप्रधान आहेत. खनाल यांनी फेब्रुवारी 2011 ते ऑगस्ट 2011 पर्यंत पंतप्रधान पद भूषवले आहे. ते नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे माजी अध्यक्ष आहेत आणि सीपीएनच्या संविधान सभेच्या संसदीय पक्षाचे नेते म्हणूनही काम पाहिले आहे.

Comments are closed.