भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तीन आठवड्यांत नेपाळच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नेपाळमध्ये पंतप्रधान बालेन शाह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सरकारविरोधात जनतेमध्ये असंतोष असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर नेपाळचे गृहमंत्री सुदान गुरुंग यांनी राजीनामा दिला आहे. गुरुंग यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता तसेच मनी लाँड्रिंगपर्यंत अनेक आरोप करण्यात आलेले आहेत. इतकेच नाही तर, एका वादग्रस्त उद्योगपतीशी संबंधित कंपन्यांमध्ये शेअर्स खरेदी केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. गुरुंग यांनी पंतप्रधान बालेन शाह यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. त्यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी नियुक्तीच्या दिवशीच मंत्रिमंडळ स्थापन करत गुरुंग यांची गृहमंत्री म्हणून नियुक्ती केली होती. परंतु त्यांनी पदभार स्वीकारताच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली. त्यामुळेच गुरुंग यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती असे वृत्त आज तकने दिले आहे.

सुदान गुरुंग यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, “मी गृहमंत्री म्हणून प्रामाणिकपणे काम करत आलो आहे. माझ्यासाठी पदापेक्षा नैतिकता अधिक महत्त्वाची आहे आणि जनतेच्या विश्वासापेक्षा मोठी शक्ती नाही. त्यामुळे, माझ्याशी संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. यासाठी, मी आजपासून गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. मी माझी नैतिक जबाबदारी पार पाडली आहे.

नेपाळचे बालेन शाह सरकार सतत वादांमध्ये अडकलेले आहे. बालेन शाह सत्तेवर येऊन जेमतेम एक महिना झाला आहे. पण त्यांच्याविरोधात जनतेत असंतोष वाढताना दिसत आहे. काठमांडूसह अनेक शहरांमध्ये विद्यार्थी, राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिक निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत. नेपाळ सरकारने हिंदुस्थानातून आयात होणाऱ्या वस्तूंवरील सीमा शुल्क वाढवले ​​आहे. १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंवर शुल्क आकारले आहे. याचा परिणाम दैनंदिन वस्तूंच्या किमतींवर होत आहे.

Comments are closed.