प्रेमाचे नाटक करत विवाहित शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार, खोटे ‘सात फेरे’ ही घेतले
शिक्षक पेशाला काळिमा फासणारी संतापजनक घटना नेरळच्या दिलकप कॉलेजमध्ये समोर आली आहे. प्रेमाचे नाटक करत कॉलेजच्या शिक्षकाने १९ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केला. एवढेच नव्हे तर खोटे ‘सात फेरे’ ही घेतले. दरम्यान आधीपासून विवाहित असलेल्या आरोपी तौसिफ ठाणगे याला बायको आणि दोन मुलांसमोर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी उचलेले.
आरोपी तौसिफ ठाणगे हा कॉलेजमध्ये लायब्ररीयन असिस्टंट म्हणून कार्यरत होता. याच काळात त्याची ओळख एका १९ वर्षीय विद्यार्थिनीशी झाली. ओळखीचे रूपांतर हळूहळू जवळिकीमध्ये झाले आणि त्याने विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे खोटे आश्वासन देत हिंदू रिवाजानुसार ‘सात फेरे’ घेतल्याचे सांगून तिची फसवणूक केली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी आधीपासून विवाहित असून त्याला दोन मुले असल्याचे पुढे आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विद्यार्थिनीने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
अनेक मुलींना फसवल्याची चर्चा
लोणावळा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी तौसिफला अटक केली. आरोपीने यापूर्वी काही मुलींना अशाच प्रकारे फसवल्याची चर्चा आहे. बदनामीच्या भीतीने अनेक पीडित मुली समोर न आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे कॉलेजमध्ये मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे
Comments are closed.