नेरळमध्ये पहाटे घर पेटले; अग्निशमन विभाग साखरझोपेत, बंब आलेच नाही; फोन उचलला नाही, पंचायत कर्मचारी, गावकऱ्यांनी विझवली आग

नेरळच्या श्री दत्त आशीष सोसायटीतील बंद घर पेटले आणि एकच धावपळ उडाली. ही आग इतकी भीषण होती की घरातून लागोपाठ चार स्फोट झाले. या स्फोटांनी परिसर दणाणून गेला होता. दरम्यान साखरझोपेत असलेल्या अग्निशमन विभागाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी ना फोन उचलला ना त्यांची गाडी घटनास्थळी पोहोचली. अखेर पंचायत कर्मचाऱ्यांसह स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग विझवली. या घटनेमुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली.
दुर्घटनाग्रस्त घर डॉ. मिलिंद पटवर्धन यांच्या मालकीचे आहे. ते नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेले होते. दरम्यान आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास एकच स्फोट झाला. एकामागोमाग एक असे चार स्फोट होताच नेरळच्या राजमाता जिजाऊ भोसले तलाव येथे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांचे लक्ष वेधले.
शॉर्टसर्किटमुळे उडाला भडका
पोलीस, ग्रामपंचायत व विद्युत कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अग्निशमन विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. या आगीत डॉ. पटवर्धन यांच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Comments are closed.