हे युद्ध वर्षानुवर्षे चालणार नाही…! नेतान्याहू यांनी सांगितला इराणविरुद्धचा इस्रायलचा गुप्त प्लॅन
अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा आज चौथा दिवस आहे. तसेच हे युद्ध कमीतकमी चार आठवडे चालेल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. आता या युद्धाच्या कालावधीबाबत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. नेतान्याहू यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत इराणविरुद्ध तात्काळ आणि निर्णायक लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की हा लष्करी संघर्ष अंतहीन राहणार नाही आणि वर्षानुवर्षे चालणार नाही.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प मंगळवारी दुपारी व्हाईट हाऊसमध्ये अर्थ आणि ऊर्जा सचिवांशी भेट घेणार आहेत. यावेळी अमेरिका आणि इस्रायल संयुक्तपणे इराणमध्ये सत्ता बदलासाठी योजना आखणार असल्याची माहिती त्यांनी दिली. इराणविरुद्धच्या या लष्करी कारवाईमुळे सौदी अरेबियासह आखाती देशात शांतता प्रस्थापित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नेतन्याहू यांनी सांगितले की, इस्रायल इराणशी दीर्घकाळ युद्ध करू इच्छित नाही. इराणविरुद्ध केली जाणारी कारवाई जलद आणि निर्णायक असेल असे ते म्हणाले. इराणमधील राजवट बदलण्याची अंतिम जबाबदारी इराणच्या लोकांवर आहे. इराणी लोकांना त्यांची राजवट बदलता येईल, अशाप्रकारे अमेरिका आणि इस्रायल संयुक्तपणे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ही लष्करी कारवाई काही काळ चालू राहू शकते परंतु दीर्घकालीन प्रक्रिया राहणार नाही. हे युद्ध वर्षानुवर्षे चालणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
व्हाईट हाऊसने जाहीर केले आहे की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प मंगळवारी दुपारी ट्रेझरी सेक्रेटरी आणि एनर्जी सेक्रेटरी यांची भेट घेतील. ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. त्यात इराणबाबत धोरणात्मक आर्थिक आणि एनर्जी निर्णयांच्या संदर्भात चर्चा होत ठोस योजना ठरण्याची शक्यता आहे.
Comments are closed.