नेदरलँड्सने 2 इस्त्रायली मंत्र्यांच्या प्रवेशावर बंदी घातली

गाझामध्ये हिंसेला बळ पुरविल्याचा आरोप : आतापर्यंत 7 देशांनी उचलले पाऊल

वृत्तसंस्था/ अॅमस्टरडॅम

नेदरलँडने इस्रायलचे अर्थमंत्री बेजलेल स्मोट्रिच आणि सुरक्षामंत्री इतमार बेन-ग्विर यांच्यावर प्रवेशबंदी घातली आहे. या दोन्ही मंत्र्यांवर गाझामध्ये हिंसेला बळ पुरविल्याचा आरोप आहे. नेदरलँडपूर्वी 6 देशीं या दोन्ही नेत्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.

इस्रायलच्या या मंत्र्यांनी वारंवार पॅलेस्टिनी नागरिकांच्या विरोधात हिंसेला चिथावणी दिली आहे. तसेच अवैध ज्यू वसाहतींच्या विस्ताराचा पुरस्कार करत गाझामध्ये नरसंहार करण्याची भूमिका मांडली असल्याचा दावा नेदरलँडचे विदेशमंत्री कॅस्पर वेल्डकॅम्प यांनी केला आहे.

नेदरलँडमध्ये इस्रायलच्या राजदूताला पाचारण करत नेतान्याहू सरकारला स्वत:ची भूमिका बदलण्याची सूचना केली जाणार आहे. वर्तमान स्थिती अत्यंत वाईट असून युद्धविरामासाठी हमासवरील दबाव वाढविण्यास नेदरलँड तयार असल्याचे वेल्डकॅम्प यांनी म्हटले आहे.

युरोप गुन्हेगारांसोबत : बेन ग्विर

नेदरलँडच्या या निर्णयावर  इस्रायलचे मंत्री बेन ग्विर यांनी नाराजी व्यक्त केली. पूर्ण युरोपमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले तरीही मी इस्रायलसाठी काम करणे सुरूच ठेवणार आहे. हमासचा खात्मा आणि इस्रायली सैनिकांना समर्थन करण्यात यावे. युरोप नेहमीच पीडितांना दोषी ठरवत आला असल्याचा आरोप बेन ग्विर यांनी केला आहे. युरोपमध्ये दहशतवादाला सहन केले जाते आणि दहशतवाद्यांचे स्वागत केले जाते. युरोपमध्ये दहशतवादी मोकाट फिरत असून ज्यूंवर बहिष्कार टाकला जात असल्याचे बेन-ग्विर यांनी म्हटले आहे.

7 देशांकडून प्रवेशबंदीचा निर्णय

इस्रायलचे मंत्री बेन ग्विर आणि स्मोट्रिच यांच्यावर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्युझीलंड, नॉर्वे आणि ब्रिटननेही प्रवेशबंदी लादली आहे. इस्रायलच्या या दोन मंत्र्यांनी वेस्ट बँक आणि गाझामध्ये पॅलेस्टिनींच्या विरोधात हिंसेला चिथावणी दिली आहे. याचमुळे या दोघांची संपत्ती जप्त केली जाईल आणि त्यांच्यावर प्रवेशबंदी लागू करण्यात येईल असे या 5 देशांनी म्हटले होते. यानंतर 17 जुलै रोजी स्लोवेनियाने या दोन्ही मंत्र्यांवर बंदी घातली होती. परंतु अमेरिकेने या निर्णयावर नाराजी व्यक्त करत याला अनावश्यक ठरविले होते.

Comments are closed.