अबब… तीन सुपर ओव्हर्सपर्यंत रंगला थरार, नेदरलॅण्ड्सचा नेपाळवर ऐतिहासिक विजय

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असून यात कधीही काहीही घडू शकते, याचा प्रत्यय पुन्हा आला. स्कॉटलंडमध्ये सुरू असलेल्या तिरंगी टी-20 क्रिकेट स्पर्धेत नेदरलॅण्ड्स आणि नेपाळ यांच्यातील सामन्याचा निकाल चक्क तिसऱया सुपर ओव्हरमध्ये लागला. तीन सुपर ओव्हर्स हा क्रिकेटच्या इतिहासातील नवीन विक्रम ठरला. अखेर या लढतीत नेदरलॅण्ड्सने बाजी मारत ऐतिहासिक विजय मिळविला.

नेदरलॅण्ड्सने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 152 धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरादाखल नेपाळ संघानेही 8 बाद 152 धावसंख्या उभारल्याने सामना ‘टाय’ झाला अन् लढत ‘सुपर ओव्हर’मध्ये गेली. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सुपर ओव्हरने निकाल लागलेला हा 41 वा सामना ठरला. मात्र तीन सुपर ओव्हर्सपर्यंत रंगलेला हा पहिलाच सामना होय, हे विशेष!

पहिली सुपर ओव्हर

नेपाळने फ़्रथम फलंदाजी करताना 1 बाद 19 धावा केल्या. यात कुशल भुरटेलने पाच चेंडूंत चार षटकार व एका षटकारासह 18 धावा फटकाविल्या. प्रत्युत्तरादाखल नेदरलॅण्ड्सकडून मॅक्स ओ’डॉड (12) आणि मायकेल लेव्हिट (6) यांनी 19 धावा करून सामना पुन्हा टाय केला.

दुसरी सुपर ओव्हर

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये नेदरलॅण्ड्सने प्रथम फलंदाजी करताना 1 बाद 7 धावा जमविल्या. नेपाळकडून ललित राजवंशी यांनी उत्तम गोलंदाजी केली. दीपेंद्रसिंह ऐरी आणि रोहित पौडेल यांनी 17 धावा करून सामना तिसऱया सुपर ओव्हरमध्ये ढकलला.

तिसऱया सुपर ओव्हरमध्ये नेपाळचा भोपळा

तिसऱया सुपर ओव्हरमध्ये नेदरलॅण्ड्सच्या कर्णधाराने ऑफस्पिनर जॅक लायन कॅचेटला गोलंदाजी दिली. 21 वर्षीय कॅचेटने नेपाळला एकही धाव मिळू दिली नाही. रोहित पौडेल आणि रूपेश सिंह दोघेही शून्यावर बाद झाले. अखेर मायकेल लेव्हिटने संदीप लामिछानेच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून नेदरलॅण्ड्सला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

Comments are closed.