नवीन आधार ॲप पत्ता बदलण्याची सुविधा देखील प्रदान करते

मोबाईल नंबर बदलण्याची सुविधा सुरू

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आता देशातील कोणताही आधार कार्डधारक आपला नोंदणीकृत मोबाइल नंबर घरबसल्या बदलू शकतो. सरकारने नवीन आधार अॅपमध्ये ही सुविधा सुरू केली आहे. तसेच आता पत्ता, नाव आणि ईमेल आयडी अपडेट करण्याची सुविधा देखील लवकरच उपलब्ध होणार आहे. अॅपद्वारे आधार अपडेट करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. कोणतेही कागदपत्रे किंवा सीएससी केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थितीची आवश्यकता नसल्याने संपूर्ण प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण होणार आहे.

‘आधार’चे नियमन करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (युआयडीएआय) नवीन डिजिटल सेवा जाहीर केली आहे. आता वापरकर्त्यांना या बदलांसाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. अॅपवर ओटीपी पडताळणी आणि फेस ऑथेंटिकेशनद्वारे सर्वकाही बदलता येते. ही सेवा दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि स्थलांतरितांसाठी सोयीस्कर ठरणार असल्याचा दावा ‘युआयडीएआय’ने केला आहे.

एक महिन्यापूर्वी ‘युआयडीएआय’ने आधार कार्डसाठी एक नवीन मोबाइल अॅप सुरू केले. वापरकर्ते एकाच फोनवर पाच लोकांपर्यंत आधार तपशील संग्रहित करू शकतात. हे अॅप फक्त आवश्यक आधार माहिती शेअर करण्याची परवानगी देते. या अॅपमध्ये कार्डधारक युपीआय वापरून स्कॅन करून पेमेंट करतो त्याचप्रकारे आधार तपशील शेअर करू शकतो. हे अॅप अधिक सुरक्षित करण्यासाठी फेस ऑथेंटिकेशन सारखी वैशिष्ट्यो जोडण्यात आली आहेत. तसेच सदर सेवेची फी भरण्यासाठी ‘पेमेंट’ पर्याय उपलब्ध करण्यात आला असून योग्य रक्कम जमा केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

आधारकार्ड अपडेट असणे अत्यावश्यक

आधार कार्ड ही देशातील सर्वात मोठी ओळख सेवा असून ती 130 कोटीहून अधिक लोकांच्या डेटाशी जोडलेली आहे. मोबाईल नंबर हा आधार कार्डचा एक महत्त्वाचा घटक आहे, कारण तो ओटीपी द्वारे बँक खाती, सरकारी अनुदाने, प्राप्तिकर पडताळणी आणि डिजिलॉकरसारख्या डिजिटल सेवांमध्ये प्रवेश प्रदान करतो. कोणत्याही आधार कार्डधारकाचा मोबाईल नंबर बदलला किंवा हरवल्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. पूर्वी, आधार अपडेट करण्यासाठी नोंदणी केंद्राला भेट द्यावी लागत होती. यादरम्यान बायोमेट्रिक पडताळणीचा त्रास आणि लांब रांगा असायच्या. तथापि, ‘युआयडीएआय’ने आता डिजिटल पद्धतीने अनेक सुविधा सोप्या केल्या आहेत.

Comments are closed.