पडद्याआडून – चिरंजीव ‘परफेक्ट’ बिघडलाय, नव्या पिढीचं नवलनाट्य!

>> पराग खोत

आताची Gen Z पिढी ही परफेक्शनच्या मागे धावणारी आहे. त्यांना स्वतःचे, नात्यांचे, करिअरचे ‘परफेक्ट’ मापदंड हवेत आणि त्या धडपडीत त्यांचं आयुष्य कधी बिघडतं याचा त्यांना थांग लागत नाही. नेमका हाच विचार घेऊन रंगभूमीवर आलेलं ताजंतवानं नाटक म्हणजे ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’. हे नाटक आजच्या पिढीतील ‘परफेक्ट लाइफ’च्या हव्यासावर हलकंफुलकं भाष्य करत, विचार करायला लावतं.

ती आणि तो या दोघांचं वैवाहिक आयुष्य सुरू आहे. अर्थात प्रत्येक जोडप्यात असलेल्या छोटय़ा-मोठय़ा कुरबुरी आणि विसंवाद इथेही आहेतच. ती करियरला प्राधान्य देणारी काटेकोर तर तो स्वच्छंद आणि प्रेमळ. अचानक या दोघांच्या आयुष्यात तो ‘तिसरा’ येतो आणि नाटय़ निर्माण होतं. हा तिसरा अगदी परफेक्ट, सर्वगुणसंपन्न असा. त्यामुळे परफेक्शनच्या प्रेमात असलेली ती साहजिकच त्याच्याकडे आकर्षित होते आणि ह्या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. हा नाटकाचा संघर्षबिंदू आहे. त्यानंतर हा तिढा कसा सुटतो? ती आणि तो परत एकत्र येतात का? तो ‘तिसरा’ नेमका कोण असतो? नाटकाच्या शीर्षकाचं नेमकं गुपित का? याची उत्तरे नाटक पाहिल्यावर मिळतात.

लेखक-दिग्दर्शकाने कथा मांडताना विनोदी प्रसंगांचा आधार घेत, वास्तवाशी नाळ जोडून ठेवत हा प्रवास रंगमंचावर उभा केला आहे. आताच्या पिढीची विचार करण्याची पद्धत, त्यांची भाषा ही नेमकी दिसते. खरंतर हे नाटक म्हणजे आधुनिक प्रेम आणि आधुनिक समस्यांकडे पाहण्याची ही एक ताजी दृष्टी आहे. मानवी नातेसंबंध, न बोलल्या जाणाऱया अपेक्षा आणि ‘परफेक्ट एव्हरीथिंग’च्या कल्पनेमागे धावताना होणारा गोंधळ यावर हे नाटक प्रकाश टाकतं. विनोद, भावना आणि रिऑलिटी चेक यांचा सुंदर मिलाफ असलेल्या या नाटकात अनपेक्षित वळणं आहेत. ते तुम्हाला हसवतं, विचार करायला लावतं आणि प्रेम, माणुसकी आणि मानवी नात्यांतील भावनांविषयीची तुमची स्वतःची मतं पडताळून तुम्हाला नव्या पिढीशी कनेक्ट करायला लावतं. हे नाटक तरुण पिढीशी थेट संवाद साधणारं आहे. उाह Z आणि श्ग्त्तहहग्aत्s साठी परफेक्ट, त्यांच्या आयुष्यासारखीच खरी वाटणारी एक कथा.

पुण्याचा लेखक-दिग्दर्शक विनोद रत्ना आणि कलादर्शन, पुणे यांनी गेल्या दोन वर्षांपासून एकापाठोपाठ एकांकिका स्पर्धा जिंकून सगळय़ांचं लक्ष वेधून घेतलं होतंच. या वर्षी अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वच्या सर्व पारितोषिकं ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ या एकांकिकेने पटकावली होती. त्यामुळे नामवंत दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचं लक्ष वेधून घेतलं आणि त्यांच्या आग्रहामुळे या एकांकिकेचं दोन अंकी नाटक त्यांच्याच ‘जिगीषा’ या नाटय़संस्थेमार्फत रंगभूमीवर आलं आहे.

नाटकाचं वैशिष्टय़ म्हणजे मूळ एकांकिकेतले सर्व कलाकार नाटकात कायम ठेवले आहेत. या नवोदित कलाकारांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करताना ही त्यांच्यासाठी स्वप्नपूर्ती असल्याचं सांगितलं. विनोद रत्ना म्हणाले, ‘नाटक हे प्रबोधनाचं मोठं माध्यम आहे. यातून आपण समाजात अनेक बदल घडवून आणू शकतो. अनेक विचार प्रेक्षकांच्या मनात ठसवू शकतो. का@लेजिअन्सना या नाटकाकडे वळवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.’

मुख्य भूमिकेतल्या तिन्ही कलाकारांनी नैसर्गिकता राखत केलेले सादरीकरण नाटकाचे खरे बळ ठरते. संवादातील उपरोध, विनोदाचे टायमिंग आणि भावनांचे उतार-चढाव त्यांनी अचूक साधले आहेत. त्यांची ऊर्जा अफाट आहे. ठळक उल्लेख करावा लागेल तो नेपथ्याचा. नाटकाच्या विषयाला आणि सादरीकरणाला अनुकूल असे नेपथ्य लाभले आहे. त्यांना प्रसंगानुरूप प्रभावी प्रकाशयोजना करून योग्य ती साथ मिळाली आहे.

एपूणच, ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ हे नाटक आजच्या नात्यांच्या ‘परफेक्शन’च्या शोधाला दाखवलेला विनोदी आरसा आहे. त्यात तुम्हालाही डोकावून पाहावं असं वाटत असेल तर हे नाटक नक्की पाहावे.

लेखक, दिग्दर्शक –  विनोद रत्ना

नेपथ्य  – ऋतुजा बोठे

संगीत – कलादर्शन, पुणे आणि

वैभव टकले

प्रकाशयोजना  – अभिप्राय कामठे

रंगभूषा – उल्लेश खंदारे

वेषभूषा – कलादर्शन, पुणे

नृत्य दिग्दर्शक – पूजा

निर्माता  – श्रीपाद पद्माकर,

दिलीप जाधव

कलाकार – वैभव रंधवे, समृद्धीकुलकर्णी, श्रेयस जोशी

Comments are closed.